पुणे -पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने सदस्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये आरोग्य तपासणी, योगा व फिटनेस बद्दलच्या कार्यशाळा, पत्रकारितेतील गुगल, मोबाईल जर्नालिझम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचे वर्कशॉप्स, प्रकल्प भेटी अशा अनेक उपक्रमातून कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात. एवढेच न्हवे तर फोटो प्रदर्शन , न्यूज रिल्स, निबंध आणि क्रीडास्पर्धांसोबत विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
- सदस्यांच्या उपचारासाठी पूर्वी एक लाख रुपयांपर्यंतचा मेडिक्लेम दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुर्दैवाने अपघाती निधन झाल्यास पाच लाख रुपयांचा अपघाती विमा देखील उतरविण्यात येतो.
या सर्व गोष्टी करत असताना एखाद्या सदस्याचे दुर्दैवाने निधन झाले तर ? मेडिक्लेम मुळे उपचारांचा दोन लाखांपर्यंतचा खर्च झाला तरी ती रक्कम रुग्णालयाला मिळते. कुटुंबाच्या तातडीच्या गरजेसाठी काय ? हा प्रश्न सातत्याने डोक्यात घोळत होता. याच हेतूने पुणे पत्रकार प्रतिष्ठानने २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात सदस्याचे आजारपणामुळे निधन झाल्यास किमान पुढील दोन महिने त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल या हेतूने तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवाने आमचे सहकारी फोटोग्राफर संदीप घोडके यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत फार मोठी नसली तरी संघटनात्मक काम करताना आपणच आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाची किंचित का होईना जबाबदारी घेण्याची भावना वृद्धिंगत व्हावी एवढाच उद्देश यामागे आहे.


