नवी दिल्ली, २५ जून २०२६: भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी भारती एअरटेल लिमिटेडला जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी एसअँडपी ग्लोबल रेटिंग्सकडून मोठा विश्वासाचा दाखला मिळाला आहे. एजन्सीने कंपनीचे दीर्घकालीन इश्यूअर क्रेडिट रेटिंग ‘बीबीबी’ वरून ‘बीबीबी+’ असे वाढवले असून स्टेबल आउटलुक कायम ठेवला आहे. हा बदल २४ जून २०२६ पासून लागू झाला आहे. यासोबतच कंपनीच्या सिनियर अनसिक्योर्ड डेट (बिना हमी वरिष्ठ कर्ज) वरील रेटिंग देखील ‘बीबीबी’ वरून ‘बीबीबी+’ करण्यात आले आहे.
ही रेटिंग वाढ भारती एअरटेलच्या सातत्यपूर्ण महसूल वाढ, मजबूत रोख प्रवाह (कॅश फ्लो), शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन आणि भारत तसेच आफ्रिका येथील व्यवसायातील उत्कृष्ट कामगिरीचे द्योतक आहे. यामुळे कंपनीची दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्याची क्षमता आणि आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसअँडपी ग्लोबलच्या अंदाजानुसार पुढील काही वर्षांत भारती एअरटेलची वाढ अधिक मजबूत राहणार आहे. कंपनीच्या ग्राहक संख्येत दरवर्षी ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, तर अॅव्हरेज रेव्हेन्यू पर यूजर (एआरपीयू) मध्ये ५ ते ७ टक्के वाढ अपेक्षित आहे. वाढती ग्राहक खर्च क्षमता आणि प्रीमियम सेवांचा वाढता वापर यामुळे हा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
कंपनीच्या आफ्रिका व्यवसायाने देखील उल्लेखनीय कामगिरी केली असून ते भविष्यातील महत्त्वाचे ग्रोथ इंजिन ठरणार आहे. आफ्रिकेतील ग्राहक संख्या दरवर्षी ९ ते ११ टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आफ्रिकेतील महसूल वाढ २०२७ मध्ये २२ ते २४ टक्के आणि २०२८ मध्ये १६ ते १८ टक्के राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष२०२८ पर्यंत आफ्रिका व्यवसायाचा कंपनीच्या एकूण ईबीआयटीडीए मध्ये २५ ते २७ टक्के वाटा असणार आहे. यामुळे कंपनीची आंतरराष्ट्रीय विस्ताराची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे दिसून येते.
एसअँडपीच्या अंदाजानुसार भारती एअरटेलचा कन्सॉलिडेटेड ईबीआयटीडीए दरवर्षी ८ ते १० टक्क्यांनी वाढत २०२७ मध्ये सुमारे १.३५ ट्रिलियन रुपये आणि २०२८ मध्ये १.४९ ट्रिलियन रुपये इतका होऊ शकतो. कंपनीचे आर्थिक बळ आणखी वाढत असून एफएफओ-टू-डेट रेशो आर्थिक वर्ष २०२७ मध्ये ५० ते ५२ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२८ मध्ये जवळपास ६० टक्के होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीचा डेट-टू-ईबीआयटीडीए रेशो २०२७ पर्यंत १.५ पट इतका सुधारेल, असा अंदाज आहे. याशिवाय भारती एअरटेल २०२८ पर्यंत ५४० ते ५७० अब्ज रुपये भांडवली गुंतवणूक (कॅपेक्स) करणार असून ही गुंतवणूक प्रामुख्याने नेक्स्ट्रा डेटा लिमिटेडच्या डेटा सेंटर्स, क्लाउड सेवा विस्तार आणि आफ्रिका व्यवसाय वाढीसाठी केली जाणार आहे.
एसअँडपी ग्लोबलने कंपनीसाठी स्टेबल आउटलुक कायम ठेवताना दूरसंचार क्षेत्रातील स्थिर स्पर्धात्मक वातावरणात कंपनीची कमाई आणि रोख प्रवाह सातत्याने वाढतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच कंपनीची लिक्विडिटी पोझिशन मजबूत असून ३१ मार्च २०२७ पर्यंत उपलब्ध निधी आणि आर्थिक स्त्रोत खर्चाच्या सुमारे १.३ पट जास्त असतील, असे एजन्सीने नमूद केले आहे. याला मजबूत ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि विविध स्रोतांमधून निधी उभारण्याची क्षमता यांचा आधार मिळत आहे.
ही रेटिंग वाढ भारती एअरटेलसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात असून कंपनीची मजबूत बाजारपेठीय स्थिती, सक्षम आर्थिक व्यवस्थापन, दीर्घकालीन वाढीची रणनीती आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवरील सातत्यपूर्ण गुंतवणूक यावर जागतिक स्तरावर विश्वास असल्याचे अधोरेखित करते.
या मानांकनामुळे भारती एअरटेलने जागतिक दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले असून ग्राहक, गुंतवणूकदार आणि सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्याची क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे.


