किशोरीताई पाठक संचालित “अब नॉर्मल होम” ला भेट देताना मनस्वी समाधान लाभते कारण येथे विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना बघून आनंद वाटतो आणि म्हणूनच समाजातील जास्तीतजास्त नागरिकांनी दिवाळी साठी ह्या मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
आमच्या कडे विशेष मुलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्याच बरोबर त्यांना व्यवहार ज्ञान ही शिकविले जाते जेणेकरून ही मुलं स्वावलंबी होतील असे अब नॉर्मल होम च्या संचालिका किशोरीताई पाठक म्हणाल्या. आम्ही मुलांना रोपं तयार करणे, पणत्या रंगविणे, कॉफी पेंटिंग करणे यासह विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देतो व त्यांची विक्री ही करतो असेही त्या म्हणाल्या.
आज क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ह्या मुलांना कलरिंग किट, विविध ब्रश, पोस्टर कलर च्या बाटल्या व इतर साहित्य भेट देण्यात आले असून येणाऱ्या काळात जे जे साहित्य लागेल ते क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे देण्यात येईल असे फाउंडेशन च्या विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.तसेच गांधी भवन कोथरूड येथे अंधशाळे शेजारी ही संस्था कार्यरत असून येथून नागरिक विशेष मुलांनी बनविलेले साहित्य खरेदी करू शकतात असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी अब नॉर्मल होम च्या शिक्षिका व प्रशिक्षक मेघना मिठभाकरे,सुजाता जावळे,अवंती राळेगावकर,वैशाली जहागीरदार उपस्थित होत्या.


