पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे तर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला गुरुवार, दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शाहिरी दरबार कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४५ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. यावेळी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. श्रीजगद््गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि.२८) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर शिवाई मातेस अभिषेक व महापूजा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा राजघराण्याचे वारसदार आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होणार आहे. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करतील. या सोहळ्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सेवाव्रती शाहिरी दरबारहा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे.
पोवाडे गायन कार्यक्रमानंतर जाहीर अभिवादन सभा होईल. यावेळी पंचक्रोशीत विशेष काम करणा-या महिलेला राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मधुकर काजळे, रमेश कर्पे व शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


