पुणे : लेखिका आरती चव्हाण यांच्या फॉर्गॉटन किंग्डम्स ऑफ इंडिया या मालिकेतील पहिल्या कादंबरीचे शॅडो ऑफ द सर्पेंट फोर्ट : ३२४ बीसीई या पुस्तकाचे प्रकाशन आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल सभागृहात उत्साहात पार पडले. प्राचीन भारतीय इतिहास, संशोधन आणि ऐतिहासिक काल्पनिक साहित्य यांवर झालेल्या विशेष चर्चासत्राने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सुनंदा मेहता यांनी केले. चर्चासत्रात दक्षिण आशियाई धर्म आणि संस्कृतचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये, ऑक्सफर्ड स्कॉलर व पर्शियन भाषांचे संशोधक डॉ. सुमित पॉल, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकाशक विशाल सोनी तसेच लेखिका आरती चव्हाण सहभागी झाले.
यावेळी बोलताना डॉ. सुमित पॉल म्हणाले की, इतिहास हा वस्तुनिष्ठपणे समजून घेतला पाहिजे. त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात; मात्र इतिहासाचे विकृतीकरण किंवा फेरफार होता कामा नये. अनेक ऐतिहासिक कालखंडांबाबत उपलब्ध नोंदी अपुऱ्या असल्याने संशोधक आणि लेखकांना उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अभ्यास करून त्या काळाचे वास्तव उभे करावे लागते.
लेखिका आरती चव्हाण यांनी सांगितले की, ऐतिहासिक कादंबरी लिहिताना संशोधन आणि कल्पनाशक्ती यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. काल्पनिक पात्रे आणि प्रसंग निर्माण करता येतात; मात्र ते त्या काळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांशी सुसंगत असणे आवश्यक असते.
त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या मुलांना ग्रीक पुराणकथांबद्दल आकर्षण निर्माण झाल्यानंतर भारतीय इतिहासातील तितक्याच रोमांचकारी कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यातूनच इ.स.पूर्व ३२४ या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आधारित शॅडो ऑफ द सर्पेंट फोर्ट या कादंबरीची निर्मिती झाली. ही केवळ ऐतिहासिक कादंबरी नसून साहस, रहस्य आणि अलौकिक घटकांची सांगड घालणारी कथा आहे.
प्रकाशक विशाल सोनी यांनी भारतीय इतिहासावर आधारित दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या गरजेवर भर देत अशा विषयांवरील साहित्याला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी, वाचक आणि मान्यवर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.


