पुणे : सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात, तर काही जण पडद्यामागे राहून उत्सव यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्सवानंतर रातोरात कचरा साफ करून दुसऱ्या दिवशी रस्ते स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी, वीज व्यवस्था सुरळीत ठेवणारे विद्युत कर्मचारी, तसेच २०-२० तास ड्युटी करून देखील वाहतुकीचे नियोजन चोख ठेवणारे पोलीस कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान केला.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील नू.म.वी प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत रासने, नगरसेविका व पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या सदस्या स्वप्नाली नितीन पंडित, नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेवक कुणाल टिळक, उदय लेले, रवींद्र माळवदकर, प्रविण परदेशी, मंडळाचे उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, किरण चौहान, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, मोहन साखरिया आदी उपस्थित होते. अग्निशमन दल अधिकारी, जीव रक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह वाद्यपथकतील वादक, सजावट कलाकार, मांडववाले, मेट्रो सेवा, पौरोहित्य करणारे गुरुजी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
हेमंत रासने म्हणाले, गणेशोत्सवाने अनेक कार्यकर्ते घडवले आहेत. आज जगातील १६० देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव यशस्वी होण्यामागे अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान असते. उत्सवाच्या काळात पडद्यामागे राहून काम करणारे सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि इतर घटक यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या लोकांच्या योगदानातून हा उत्सव साजरा होतो, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितीन पंडित म्हणाले, मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. उत्सवादरम्यान पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्वतःच्या घरातील उत्सवात सहभागी होता येत नसतानाही ते आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.


