पुणे, दि. २ (जिमाका, वृत्त सेवा): शासनाच्या २७ जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार सन २०२६-२७ साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, पुणे जिल्ह्यात मृग बहार हंगामासाठी डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ, द्राक्ष व अंजीर या सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, तसेच कृषी क्षेत्रातील आर्थिक स्थैर्य व पतपुरवठा कायम राहावा, हा या योजनेचा उद्देश आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही नोंदणीकृत भाडेकरारासह सहभागी होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS) नोंदणी व अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य आहे. किमान २० गुंठे व कमाल ४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण लागू राहणार असून, केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स, विसावा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई ही योजना राबविणारी विमा कंपनी असून, पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000


