पुणे : आषाढी वारीनिमित्त श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिंडी क्रमांक २० आणि ८६ मधील सुमारे ८०० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषधे देण्यात आली. या आरोग्य शिबिरात होमिओपॅथी, ऍलोपॅथी, ओझोन थेरेपी आणि आयुर्वेदिक तपासणी करण्यात आली. तसेच सर्व वारकरी बांधवांना मसाज थेरपी देण्यात आली
लायन्स इंटरनॅशनलचे प्रथम गव्हर्नर राजेंद्र गोयल, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, लायन्स क्लब पुणे सिटीचे अध्यक्ष दीपक थोरात, खजिनदार बजरंग आकडे, सहसचिव अमर लांडे, दिलीप थोरात, शिबिरप्रमुख डॉ. दिलीप कुलकर्णी, शरद कुऱ्हाडे, श्रीकांत कुऱ्हाडे, रवींद्र फटाले, प्रसाद माने, महेश लेले, अखिल मंडई मंडळाचे सचिव विश्वास भोर, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेजाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव योगेश वराडे, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण विभागाची दिंडी विशेष आकर्षण ठरली. विठ्ठल, रुक्मिणी आणि गणेश यांच्या वेशभूषेतील बालचमूने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मुक्कामी आलेल्या सर्व वारकरी बांधवांसाठी ट्रस्टतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होमिओपॅथी विभागात डॉ. तन्वी कुऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, आयुर्वेद विभागात डॉ. सायली वराडे यांनी, तर ॲलोपॅथी विभागात डॉ. तृप्ती भाग्यवंत यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून वारीदरम्यान आवश्यक औषधांचे वाटप केले.
याशिवाय राम राज्य संकल्प साधना, आरएसएस फाउंडेशन, जनमित्र सेवा संघ आणि लायन्स क्लब पुणे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले. गुडघेदुखी व सांधेदुखीवर उपयुक्त ठरणाऱ्या या शिबिराचा अनेक निवासी वारकऱ्यांनी लाभ घेतला.


