Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाहिरी हे लोकसंस्कृतीचे वेद इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ मंदार...

शाहिरी हे लोकसंस्कृतीचे वेद इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ मंदार लवाटे यांचे मत : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ

पुणे : ज्याप्रमाणे वेद हे आपल्या ज्ञानाचे भांडार आहेत त्याप्रमाणे शाहिरी हे लोकसंस्कृतीचे वेद आहेत. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. आयुष्यात जे काही शिकता येईल ते शिकत राहा. प्रत्येक अनुभव आणि ज्ञानाचा प्रत्येक कण आपल्या आयुष्यात साठवत राहा. योग्य वेळी हेच ज्ञान आणि अनुभव आपल्या आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतात, असे मत इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी व्यक्त केले.

 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गा’च्या ३० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील कलाग्राम दालनात झाला. या विनामूल्य पोवाडा वर्गाचे उद्घाटन इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ मंदार लवाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ संकलक संजीव वेलणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे होते यावेळी प्रबोधिनीच्या कार्याध्यक्ष प्राध्या. सौ. संगीता मावळे उपस्थित होत्या.

 

मंदार लवाटे म्हणाले, इंटरनेटपूर्व काळात प्रत्येक मोठ्या घराण्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची नोंद केली जात असे. त्या घरातील कर्ती व्यक्ती किंवा त्यांचे कारभारी या घटना लिहून ठेवत. त्यामुळे आज त्या नोंदी पुण्याच्या इतिहासातील महत्त्वाचे दस्तऐवज ठरल्या आहेत. प्रत्येक घटनेचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्या जतन केल्या जात होत्या. आजही अनेक संशोधक वर्षानुवर्षे या नोंदींचा शोध घेऊन इतिहास जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.

 

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे मुख्य कार्य म्हणजे पोवाडा या लोककलाप्रकाराचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे होय. गेली ३० वर्षे निरंतरपणे विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य प्रबोधिनी करत आहे. पोवाडा ही केवळ कला नसून, ती इतिहास, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि संस्कार यांची परंपरा जपणारी लोककला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार यांनी तर आभार प्रदर्शन सौ.प्रीती खोसे यादव यांनी केले. निरंतर वर्ग दर शनिवारी संध्याकाळी ७ ते ८- १५ या वेळात रमणबाग शाळेत होणार आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत हा वर्ग विनामूल्य चालेल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments