Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुवकांनी संस्कारक्षम उपक्रमात सक्रीय व्हावे - खासदार मेधा कुलकर्णी

युवकांनी संस्कारक्षम उपक्रमात सक्रीय व्हावे – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे, दि. २६ जुलै – आजची युवा पिढी इंटरनेटच्या ज्ञानावर वाढते आहे, ज्यात मूळ संस्कारांचा अभाव जाणवतो. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत संस्कारक्षम उपक्रमात सहभागी होत भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करायला हवी, असे प्रतिपादन खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज येथे केले.

एम.आय.टी. विद्यापीठातील विवेकानंद सभागृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित सुन्दरकाण्ड ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, गुरुदेव शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, कुठेतरी आपली मूळ संस्कृती हरवत चालली आहे. इंटरनेटवर नको ते सगळे आहे. तरुण पिढीला संस्कारक्षम असे चांगले प्रबोधन होण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे समृद्ध ज्ञानाची मोठी परंपरा आहे. देशकार्याला अध्यात्माची जोड द्यायला हवी. दुर्दैवाने आज विडंबन करणारी कीर्तने होत आहेत, जे बदलायला हवे.

यावेळी शंकर अभ्यंकर म्हणाले की, वाल्मीकि रामायणावरील टीकाभाष्य असलेल्या शङ्कर रामायणातील आज प्रकाशित झालेले सुन्दरकाण्ड सुमारे ९ हजार पाचशे ओव्यांचे आहे. उरलेली दोन काण्डे (युद्धकाण्ड व उत्तरकाण्ड) देखील लवकरच प्रकाशित होणार आहेत. हा संपूर्ण ग्रंथसंच सुमारे ७५ हजार ओव्यांचा होईल, जो विश्वविक्रमी असेल.

योगेश सोमण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शंकर अभ्यंकर व सहकाऱ्यांनी वारकरी कीर्तन सादर केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले तर जितेंद्र अभ्यंकर यांनी आभार मानले.
——–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments