Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedठशांची नोंद न होणाऱ्या वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा* *‘आपले...

ठशांची नोंद न होणाऱ्या वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा* *‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून प्रक्रिया; प्रमाणीकरण न झाल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत ओळख निश्चिती*

*

पुणे, दि. १९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत १६.९६ लाख पात्र लाभार्थी असून, त्यापैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

वयस्कर शेतकऱ्यांना किंवा बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणात अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) आधार कार्ड व बँक पासबुक सोबत घेवून जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरण करण्यात येईल.

एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय सेवा केंद्र चालकाने निवडावा. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदार यांच्याकडे ऑनलाइन पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी स्वतःची ओळख निश्चित करणारी कागदपत्रे सादर करावीत.

तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीमार्फत तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण वरील प्रक्रियेनुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments