पुणे : आपली भारतीय संस्कृती ही त्यागप्रधान संस्कृती आहे. सात समुद्रांपलीकडची संस्कृती भोग प्रधान संस्कृती. या ठिकाणी आधी त्याग आणि जमले तर भोग आहे, आणि सात समुद्रांपलीकडे आधी भोग आणि जमले तर त्याग. सीता रामासाठी त्याग करते, भरत रामासाठी त्याग करतोय, लक्ष्मण रामासाठी त्याग करतोय. त्यागावरती भारतीय संस्कृती उभी आहे, असे मत ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे भावार्थ महाराज देखणे यांच्या भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कार्यक्रमाने चार्तुमास कीर्तन महोत्सवाचा समारोप झाला.
ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे म्हणाले, सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येला डोक्यावर धारण करायचे असते. म्हणून श्रीकृष्णाने सरस्वतीचे वाहन असलेल्या मोराचे एक पीस घेतले आणि शिरावरती बांधले. कारण आपली संस्कृती विद्येला डोक्यावर धारण करायला शिकवते. त्याचाच प्रतिनिधी म्हणून वासुदेवाने मोरपिसांचा टोप डोक्यावरती धारण केला. विद्येला डोक्यावर धारण करायचे असते. दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये विद्येला पायदळी तुडवले जात आहे. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगामध्ये दुसरी कुठली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी उपस्थितांसमोर सादर केली.
महोत्सवात नाशिक येथील वारकरी भूषण श्रीगुरु ह.भ.प.चैतन्य महाराज निंबोळे, आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री, आळंदी साधकाश्रम येथील ह.भ.प.यशोधन महाराज साखरे, पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास, डोंबिवली येथील श्रीमलंग गड येथील आॅनलाईन कीर्तन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, परभणी मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे आणि पंढरपूर येथील मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन झाले. याशिवाय जगद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक जगद्गुरु कृपांकित ह.भ.प.डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन आणि महोत्सवाचा समारोप ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाने झाला.


