पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- कामगार चळवळ, सामाजिक व राजकीय क्षेत्र आणि मराठी साहित्यविश्वात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे मोशी येथील ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कामगार नेते तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांचा आज महापालिका सभेत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहरातील विविध नागरी व सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी योगदान दिले. तसेच पुणे जिल्हा वीज वितरण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक जडणघडणीशी निगडित असलेल्या कामगार चळवळीत अरुण बोऱ्हाडे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय राहिले आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले. सन २००३ मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीतील कामगार आंदोलनासह बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का तसेच चाकण औद्योगिक पट्ट्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले. श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातूनही त्यांनी कामगार चळवळीला संघटित बळ देण्याचे कार्य केले.
कामगार व सामाजिक चळवळीबरोबरच मराठी साहित्य क्षेत्रातही बोऱ्हाडे यांनी स्वतंत्र ठसा उमटविला आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना करून साहित्यिक, लेखक आणि नवोदित प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाची विविध संस्थांनी पुरस्कारांच्या माध्यमातून दखल घेतली असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कार्याचा वेध घेणारा ‘अरुणगंध’ हा गौरवग्रंथही प्रकाशित करण्यात आला आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेला संघर्ष, लोकप्रतिनिधी म्हणून केलेली जनसेवा आणि मराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव म्हणून महापालिका सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि नगरसदस्यांनी त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आर.पी.आय.नेते कुणाल वाव्हळकर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, ‘क’ प्रभाग समिती अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, ‘ई’ प्रभाग समिती अध्यक्ष अर्चना सस्ते, नगरसदस्य राहुल जाधव, निलेश नेवाळे, सारिका गायकवाड,सारिका सस्ते यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


