पुणे, दि. २४ ऑगस्ट २०२६ : ‘काँक्रिट दिना’चे औचित्य साधून अल्ट्राटेक सिमेंटच्या सहयोगाने महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन तर्फे (बीएनसीए) १३ व १४ ऑगस्ट रोजी दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला. त्यामध्ये काँकिटची प्रात्यक्षिके,कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच प्रश्नमंजुषा आणि रील्स स्पर्धा इत्यादी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अल्ट्राटेक सिमेंटच्या विभागीय प्रमुख अभियंता शीतलराज सिंदखेडे यांचे व्याख्यान पहिल्या दिवशी आयोजित केले होते. बीएनसीएच्या द्वितीय वर्षाच्या दीडशे विद्यार्थिनी या व्याख्यानास उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन स्ट्रक्चर सेल विभागप्रमूख डॉ. सुजाता मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कांचन अतनूरकर, प्रा.श्वेता अलबाळ, प्रा. स्वप्निल शिंदे आणि प्रा. प्रीती नामजोशी यांनी १३ विद्यार्थिनींसोबत केले.
बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शुभदा कमलापूरकर आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, तसेच प्रा. महेश बांगड, आर्किनियरिंग विभागप्रमूख डॉ. पूर्वा कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँक्रिट दिनाच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्या डॉ. कमलापूरकर आणि उपप्राचार्य डॉ. धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुजाता मेहतांनी काँक्रिट दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
‘काँक्रिट दिना’ निमित्त आयोजित केलेल्या आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत बीएनसीएच्या शर्वरी पाठक आणि हरिता राघवेंद्रन या विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच तर द्वितीय आणि तृतीय पारितोषिक भारतीय कला प्रसारिणी सभेच्या (बीकेपीएस) आर्किटेक्चर महाविद्यालयातील अनुक्रमे राधा गद्रे, हर्षदा चिंचाळकर तसेच अपूर्वा घायाळ
आणि नम्रता कचरे यांना मिळाले. पुण्यातील १५ महाविद्यालयांमधील शंभर विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
याशिवाय ‘प्रख्यात आर्किटेक्ट्सने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण काँक्रिट वास्तुंचे’ रील तयार करण्याच्या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर शिवदत्त पाटणे आणि प्रसिद्ध कलाकार व आर्किटेक्ट दीप्ती लेले यांनी, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर प्रा. जयंत इनामदार आणि प्रा. हेमंत जोशी यांनी अंतिम फेरीचे परिक्षण केले. याशिवाय काँक्रिट कार्यशाळेत बीएनसीएच्या द्वितीय वर्षाच्या दीडशे विद्यार्थिनींनी फुटिंग, कॉलम-बीम जंक्शन इत्यादींची प्रमाण कृती मॉडेल्स बनवली. अल्ट्राटेक सिमेंटने या उपक्रमाचे प्रायोजिकत्व केले असून अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन बीएनसीएच्या तळमजल्यावर आयोजित केले होते.


