पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक कै. भगीरथ तापडिया यांचे जीवन हे कर्मयोगाचा आदर्श होते. त्यांच्या विचारांतून आणि कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार मालपाणी समूहाचे संचालक व गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी काढले.
भगीरथ तापडिया यांच्या जन्मशताब्दी व महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या (MIG) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त MIG व तापडिया परिवारातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एस. पी. जैन एफएमबी कार्यक्रमाचे ग्लोबल संचालक डॉ. परिमल मर्चंट उपस्थित होते.
MIGच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘वारसा जपत भविष्य घडविणे’ हा केंद्रबिंदू ठेवून विविध राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. नेहा लद्दड यांनी सांगितले. यावेळी MIGच्या ५० वर्षांच्या उद्योजकीय कार्यावर आणि कै. भगीरथ तापडिया यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपटांचे प्रदर्शन तसेच ‘MIG-National’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
MIGचे माजी अध्यक्ष राजेंद्र तापडिया यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, “वडिलांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली आहे. तत्वनिष्ठा, समाजसेवेची तळमळ आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याचे धडे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या कार्यातून, त्यांनी घडवलेल्या माणसांतून आणि संस्थांतून ते आजही आपल्यात जिवंत आहेत.”
डॉ. मालपाणी म्हणाले, “अपयशातून सुधारणा करून पुढे जाणे, कामात शिस्त ठेवणे आणि केवळ स्वतःचा नव्हे तर सर्वांचा विचार करणे, हा भगीरथजींच्या जीवनाचा संदेश होता. इतरांचे भले करण्याची भावना असेल तर कामाची गुणवत्ताही बदलते.”
बहुआयामी कार्याचा गौरव
स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिल्यानंतर भगीरथ तापडिया यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा, विवाहातील अवाजवी खर्चाला विरोध आणि समाजकार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी महेश सेवा दलाची स्थापना अशा विविध कार्यातून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.
जीवनमूल्यांचा आदर्श
अदानी सिमेंटचे सीईओ विनोद बाहेती यांनी सांगितले की, विद्यार्थी असताना भगीरथ तापडिया यांच्याकडे काम करताना त्यांनी शिक्षणासोबत जीवनाचे अनेक धडे घेतले. आर्थिक अडचणीच्या काळात तापडिया यांनी शिष्यवृत्ती देऊन आधार दिला. “त्यांनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर जीवनमूल्यांची शिदोरी दिली. आज मी जो काही आहे, त्यात भगीरथजींचा मोठा वाटा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक आणि व्यावसायिक परिवारातील सदस्य उपस्थित होते.
भगीरथ तापडिया हे खरे कर्मयोगी : डॉ. संजय मालपाणी
RELATED ARTICLES


