*
पुणे, दि. २५ : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकाची अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सुचनानूसार शेततळयामध्ये पडून जीवित हानी सारख्या होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
त्याअन्वये शेततळ्याभोवती मजबूत व सुरक्षित कुंपण करणे, जेणेकरून लहान मुले, अनधिकृत व्यक्ती व जनावरे अनावधानाने शेततळ्यात प्रवेश करणार नाहीत. तारेचे कुंपण करणे संबंधित शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यास, शेततळ्याभोवती स्थानिक हवामान व जमिनीच्या परिस्थितीस अनुकूल अशा काटेरी, संरक्षक वनस्पतींची लागवड करून जैविक कुंपण करण्यात यावे जेणेकरून कोणीही अनावधानाने शेततळ्यात प्रवेश करणार नाही.
शेततळ्याच्या सुरक्षित भागावर आपत्कालीन परिस्थितीत पकडण्यासाठी उपयोगी पडतील असे काठावर गाठी मारलेले मजबूत दोरखंड लावावेत. शेततळ्याच्या दर्शनी भागात “धोका शेततळ्यात बुडून जीवितहानी होऊ शकते” अशा आशयाचा स्पष्ट, मोठ्या अक्षरातील व सहज दिसणारा चेतावणी फलक लावावा आणि त्यावर स्थानिक रुग्णवाहिका (108) व तसेच संबंधित पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक ठळक अक्षरात नमूद करावा.
प्लास्टिक अस्तरीकरण केलेल्या शेततळ्याच्या उतारावर आवश्यकतेनुसार दोरखंडाची चौकोनी जाळी, सुरक्षित पकड व्यवस्था करणे, ज्यामुळे घसरलेल्या व्यक्तीस बाहेर येण्यासाठी आधार मिळू शकेल. आवश्यकतेनुसार शेततळ्याच्या ठिकाणी तरंगते, बचावासाठी उपयोगी साधन (उदा. ट्यूब, दोरखंड, सुरक्षितरीत्या बांधलेले प्लास्टिकचे रिकामे कॅन इत्यादी) उपलब्ध ठेवावेत. शेततळ्याच्या परिसरात लहान मुलांना व अनधिकृत व्यक्तींना प्रवेश होणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व्यवस्था करावी, असेही श्री. काचोळे यांनी कळविले आहे.
0000


