Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रगत ओव्हरीयन कॅन्सरवर (अंडाशयाच्या कर्करोगावर) पुण्यातील पहिली पूर्णपणे...

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रगत ओव्हरीयन कॅन्सरवर (अंडाशयाच्या कर्करोगावर) पुण्यातील पहिली पूर्णपणे रोबोटिक सीआरएस + एचआयपीईसी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली

ओपन सर्जरीचा अवलंब न करता रोबोटिक सहाय्याने १२ तासांची ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया पूर्ण, जी भारतातील अशा मोजक्याच शस्त्रक्रियांपैकी एक ठरली

पुणे, ऑगस्ट २७, २०२६: चिंचवड, पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने प्रगत कर्करोग उपचारात एक महत्त्वाचा टप्पा गाठला, जिथे ५१ वर्षांच्या महिलेवर प्रगत ओव्हरीयन कॅन्सरसाठी पुण्यातील पहिली पूर्णपणे दा विंची रोबोटिक सायटोरिडक्टिव्ह सर्जरी (सीआरएस) आणि हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी (एचआयपीईसी)ची एकत्रित शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली.

ही शस्त्रक्रिया आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या रोबोटिक सर्जरी नर्सिंग आणि टेक्निकल टीमच्या सहकार्याने पार पडली. यामध्ये आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील गायने ऑन्कोलॉजी व रोबोटिक सर्जन डॉ. निखिल परवते यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्रा आणि कन्सल्टंट जीआय सर्जन डॉ. निखिल जिल्लावार यांचा समावेश होता. तसेच या शस्त्रक्रियेला अॅनेस्थेशिओलॉजीचे सीनियर कन्सल्टंट डॉ. तानाजी म्हात्रे, इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या डायरेक्टर डॉ. उर्वी शुक्ला, नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुमठेकर आणि इन्फेक्शियस डिसीजेसचे कन्सल्टंट डॉ. विप्लव वैद्य यांचे सहकार्य लाभले.

पत्रकार परिषदेदरम्यान या केसची माहिती देण्यात आली, जिथे वैद्यकीय टीमने या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे तपशील आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची भूमिका याबद्दल माहिती सांगितली. कोणत्याही टप्प्यावर ओपन सर्जरीचा अवलंब न करता केवळ दा विंची सर्जिकल रोबोटचा वापर करून पूर्ण केलेली भारतातील ही अंदाजे सातवी शस्त्रक्रिया असल्याचा दावा हॉस्पिटलने केला आहे.

सीआरएस + एचआयपीईसी ही उपचारांची अत्यंत गुंतागुंतीची पद्धत आहे, जी पोटाच्या पोकळीत पसरलेल्या प्रगत कर्करोगाच्या निवडक केसेसमध्ये वापरली जाते. यामध्ये पोटातून दिसणारे सर्व ट्युमर काढले जातात आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या सूक्ष्म पेशींना नष्ट करण्यासाठी पोटाच्या पोकळीत गरम केमोथेरपीचे द्रव फिरवले जाते.

ही रुग्ण महिला प्रगत ओव्हरीयन कॅन्सरसह आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आली होती, जो तिच्या पोटात, ओटीपोटात (पेल्विस) आणि फुफ्फुसाच्या आवरणापर्यंत पसरला होता. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वाटेगावकर यांच्या देखरेखीखाली तिच्यावर केमोथेरपीच्या तीन सायकल्स करण्यात आल्या. उपचारांनंतर तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे ती मुख्य शस्त्रक्रियेसाठी योग्य ठरली.

त्यानंतर हॉस्पिटलच्या ट्युमर बोर्ड आणि क्रिटिकल केअर, अॅनेस्थेशिया, नेफ्रॉलॉजी आणि संसर्गजन्य रोग (इन्फेक्शियस डिसीजेस) या विभागांतील तज्ज्ञांच्या बहुविद्याशाखीय टीमने (मल्टीडिसिप्लिनरी टीम) या केसचे मूल्यमापन करून शस्त्रक्रियेला मंजूरी दिली.

पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त करत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे गायने ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जन डॉ. निखिल परवते म्हणाले, “पुण्यातील प्रगत कर्करोग शस्त्रक्रियेच्या सीमा अधिक विस्तारण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही गुंतागुंतीची सीआरएस + एचआयपीईसी शस्त्रक्रिया पूर्णपणे रोबोटिक सहाय्याने पूर्ण करण्यासाठी रुग्णाची योग्य निवड, सूक्ष्म नियोजन आणि विविध विभागांमधील जवळचा ताळमेळ आवश्यक होता. आमच्यासाठी हे यश केवळ रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यापुरते मर्यादित नसून कर्करोगाची गुंतागुंतीची केस हाताळण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान, तज्ज्ञता आणि बहुविद्याशाखीय काळजी (मल्टीडिसिप्लिनरी केअर) एकत्र आणणे हे आहे.”

ही शस्त्रक्रिया सुमारे १२ तास चालली, ज्या दरम्यान सर्जिकल टीमने पोटाच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि दिसणारा ट्युमर काढण्यासाठी रोबोटिक सहाय्य घेतले. यानंतर एचआयपीईसी प्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमानाला गरम केलेले सिस्प्लेटिन औषध ९० मिनिटांसाठी पोटाच्या पोकळीत फिरवले गेले. ओपन सर्जरीचा अवलंब न करता ही शस्त्रक्रिया पूर्ण होणे या प्रक्रियेचा एक मुख्य पैलू होता.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्रा म्हणाले, “या केसची गुंतागुंत केवळ कर्करोगाच्या प्रसारापुरती मर्यादित नव्हती, तर किमान छिद्र पाडून (मिनीमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने) ट्युमर पूर्णपणे काढून टाकण्याची आवश्यकता होती. ओपन सर्जरीचा अवलंब न करता ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडणे, हे अत्यंत समन्वयीत क्लिनिकल टीमच्या पाठिंब्यासह दा विंची रोबोटच्या प्रगत क्षमतेचे महत्त्व दर्शवते. अशा केसेस दाखवून देतात की, तंत्रज्ञानाची जोड क्लिनिकल तज्ज्ञता आणि सूक्ष्म नियोजनाला मिळते, तेव्हा कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या उपचारांमधील शक्यता अधिक वाढू शकतात.”

या प्रक्रियेच्या यशस्वी पूर्ततेमुळे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलची दा विंची रोबोटिक सर्जरी आणि प्रगत ऑन्कोलॉजी प्रोग्रामसाठी महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे, ज्यामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांसाठी गुंतागुंतीच्या व विशेष कर्करोग उपचार क्षमता उपलब्ध करून देण्याचे हॉस्पिटलचे ध्येय अधिक दृढ झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments