*
*▪️ रस्त्यांवरील खड्डे, साईडपट्ट्या, गाळ व कचरा हटविण्याची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा*
*▪️ आवश्यकतेनुसार २४ तास वाहतूक वळवून रस्त्यांची कामे पूर्ण करा; पर्यायी मार्गाचे पूर्वनियोजन करा*
*▪️ वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे प्रथम हटवा; त्यानंतर त्या जागी तातडीने पायाभूत सुविधा उभारा*
*▪️ पार्किंग, ड्रेनेज व वाहतूक व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण करून एकात्मिक आराखडा तयार करा*
पुणे, दि. २८ : चाकण परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवा तसेच अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी तातडीने रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमणे, पार्किंग व ड्रेनेजची कामे समन्वयाने वेगाने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास चोवीस तास वाहतूक वळवून काम पूर्ण करून रस्ता तातडीने वाहतुकीस खुला करावा. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे, साईडपट्ट्या, गाळ व कचरा हटविण्याची तातडीची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश देत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज कार्यवाहीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण व वाहतूक व्यवस्थापन उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित विभागांना विविध सूचना दिल्या. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविणे व तातडीची रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. त्यानंतर १ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील कामे सुरू करता यावीत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतच्या कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, असे त्यांनी सांगितले.
*रस्त्याच्या कामासाठी वाहतूक वळविण्याचे नियोजन*
रस्त्याचे काम सुरू असताना त्याच मार्गावरून सातत्याने वाहतूक सुरू ठेवल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता या दोन्हींवर परिणाम होतो. त्यामुळे कामाचे स्वरूप व कालावधी लक्षात घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे पूर्वनियोजन करावे. आवश्यक असल्यास काही दिवस चोवीस तास काम करून रस्ता पूर्ण करावा, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
संबंधित विभागांनी कामाचे टप्पे (स्टॅगरिंग) आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत स्पष्ट नियोजन करावे. पीएमआरडीए तसेच इतर विभागांची सुरू असलेली कामे परस्पर समन्वयाने पूर्ण करून वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, याची दक्षता घ्यावी. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्राधान्याने उपाययोजना करून रस्ते दुरुस्तीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*पार्किंगसाठी नियोजन*
पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध पार्किंगच्या जागांचा सुस्पष्ट नकाशा तयार करून तो संबंधित उद्योग, वाहनचालक आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचवावा. कोणत्या उद्योगातील वाहनांसाठी कोणते पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती सोप्या पद्धतीने देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
वाहतूकदारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ट्रान्सपोर्ट विभाग तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशन सोबत बैठक घेऊन पार्किंग व वाहतूक व्यवस्थेबाबत पुढील नियोजन करावे. रिक्षा, मालवाहू वाहने तसेच अन्य वाहनांच्या लोकेशन व वाहतुकीच्या हालचालींचा अभ्यास करून त्याचा वाहतूक आराखड्यात समावेश करावा, असेही त्यांनी सांगितले.
*वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे प्रथम हटवा*
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या अतिक्रमणांवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे प्राधान्याने हटवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी तातडीने रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात. कारवाईनंतर संबंधित जागेचा पुन्हा गैरवापर होणार नाही, यासाठी पुढील कार्यवाहीचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक नाले आणि ड्रेनेजच्या कामांमध्ये आढळलेल्या त्रुटी तसेच अपूर्ण कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, असेही त्यांनी निर्देशित केले. तसेच चाकण परिसरातील ज्या ठिकाणी अतिक्रमण ते अतिक्रमण हटविले गेले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
*चाकणचे सर्वंकष सर्वेक्षण करा*
चाकण परिसरातील सर्व रस्ते, ड्रेनेज, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणात आढळलेल्या त्रुटींची नोंद करून त्यावर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना कराव्यात. कोणतीही बाब प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
रस्ते, ड्रेनेज, वाहतूक आणि पार्किंगची कामे नियोजनपूर्वक करावीत. भविष्यात पुन्हा रस्ता खोदण्याची किंवा त्याच ठिकाणी वारंवार विविध कामे करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने एकात्मिक नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“रस्त्याच्या कामासाठी आवश्यक तेवढ्या कालावधीसाठी वाहतूक वळविण्याची मुभा देऊन काम पूर्ण क्षमतेने करा. ३१ ऑगस्टपर्यंत तातडीची कामे पूर्ण करा आणि त्यानंतरची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू ठेवा. अतिक्रमण हटविल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी तातडीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारा,” असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
यावेळी चाकण परिसरातील नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या. त्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली असून, नागरिकांच्या समस्यांवर गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.


