*
पुणे, दि. २८ : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दिवे कार्यालय येथे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. स्कूल बस चालक व वाहनमालकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने स्कूल बस वाहनांची तपासणी व त्यांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही दिवे कार्यालयात कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.
स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या वाहनांसह दिवे कार्यालय येथे उपस्थित राहून वाहनांची तपासणी करून घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणा साठी स्कूल बस वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी निर्धारित दिवशी वाहनांसह उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील स्कूल बस चालक, मालक तसेच संबंधित संघटनांनी या विशेष मोहिमेची नोंद घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनांची आवश्यक तपासणी व प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे, असेही विभागाने कळविले आहे.


