Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता* *पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन...

नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता* *पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा*

*
*प्रथम पारितोषिक विजेत्या कलाकारांना ‘देऊळ बंद ३’मध्ये संधी देणार : प्रवीण तरडे*

*सहकलाकारांची निवड विचारपूर्वक करा : संकर्षण कऱ्हाडे*

पुणे : कोथरूड परिसरातील नवोदित आणि हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता झाली. कोथरूडमधील विविध सोसायट्यांतील कलाकारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभिनय आणि सादरीकरणातून आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली.

स्पर्धेतील विजेत्या आणि उत्कृष्ट कलाकारांचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे आणि अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “कोथरूडमधील अनेक सोसायट्यांमध्ये उत्तम कलागुण असलेले कलाकार आहेत. त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा ‘नामदार करंडक’ आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेच्या प्रत्येक पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या पर्वात १५, दुसऱ्या पर्वात १८ आणि तिसऱ्या पर्वात २५ सोसायट्यांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी ही संख्या ५० पर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा आहे.”

पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सोसायटीला २५ हजार रुपये प्रोत्साहनपर, तर प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी कलाकारांचे कौतुक केले. नवोदित कलाकारांनी दाखविलेला उत्साह, सादरीकरणातील कल्पकता आणि अभिनयातील आत्मविश्वास यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, “चंद्रकांतदादांसारखा कलासक्त लोकप्रतिनिधी लाभला, हे कोथरूडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थी परिषदेतील कामाच्या अनुभवामुळे ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. एकांकिकेचा आनंद हा वेगळाच असतो. कोथरूडमधील ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धा ही भारतातील एकमेव अशा स्वरूपाची स्पर्धा असेल, असा मला विश्वास आहे.”

‘नामदार करंडक’च्या प्रथम क्रमांकाच्या संघातील उत्कृष्ट स्त्री आणि पुरुष कलाकारांना आगामी ‘देऊळ बंद ३’ या चित्रपटात काम करण्याची संधी देणार असल्याची घोषणाही प्रवीण तरडे यांनी केली.

अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या मिश्किल शैलीत, “पुढच्या वर्षी कोथरूडमध्ये घर घेता यावं, इथे स्पर्धक म्हणून नाटक सादर करता यावं आणि प्रवीण तरडे सरांनी एकदा तरी चित्रपटात संधी द्यावी,” अशी इच्छा व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, “कोथरूडमधील विविध सोसायट्यांना एकत्र आणणे हे खूप कठीण काम आहे. माणसांना जोडणारी ही स्पर्धा होत आहे, याचा आनंद आहे. चंद्रकांतदादांनी हे करून दाखवले, हे अतिशय अभिनंदनीय आहे.” सांघिक भावना अधिक बळकट करण्यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांनी नाटकातील सहकलाकारांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.

अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणाल्या, “आम्ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधून पुढे आलो. आंतरबँक स्पर्धाही पाहिली आहे. मात्र, आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेची संकल्पना अतिशय भावली. विविध क्षेत्रांत काम करणारे लोक सोसायट्यांमध्ये राहतात. त्यांना नाटक किंवा रंगभूमीची पार्श्वभूमी नसते. सोसायटीचे वातावरणही वेगळे असते. मात्र, या स्पर्धेच्या निमित्ताने ते एकत्र येतात, ही कौतुकाची बाब आहे.”

परीक्षक यशवंत बाळ म्हणाले, “स्पर्धेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. प्रत्येक वयोगटातील कलाकार उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत, हेच या स्पर्धेचे यश आहे. स्पर्धेतील हौशी आणि नवोदित कलाकारांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली आहे.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धेच्या संयोजिका मधुरा वैशंपायन म्हणाल्या, “चंद्रकांतदादांनी कोथरूडमधील हौशी आणि नवोदित कलाकारांसाठी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. हौशी आणि नवोदित कलाकार एकांकिकेच्या सादरीकरणादरम्यान कसलेल्या कलाकारांप्रमाणे प्रत्येक बारकाईकडे लक्ष देत आहेत.”

‘नामदार करंडक’मुळे कोथरूडमधील विविध सोसायट्यांतील कलाकारांना एकत्र येण्याची, आपल्या कलागुणांना वाव देण्याची आणि रंगभूमीशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची संधी मिळाली. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्याने ‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची संस्मरणीय सांगता झाली.

यावेळी स्पर्धेचे संयोजक आशुतोष वैशंपायन, भाजप पुणे शहर सरचिटणीस तथा नगरसेवक पुनीत जोशी, परीक्षक यशोधन बाळ, अनुराधा राजहंस, वीणा फडके, भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या मधुरा वैशंपायन, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, नगरसेविका अल्पना वर्पे, ॲड. वासंती जाधव, मंजुषा खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, मनिषा बुटाला, रेश्मा बराटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

*निकाल*

‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वात नंदन प्रॉस्पेरा सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला. बळवंतपूरम आणि साम्राज्य सोसायटीला द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला, तर माऊंट वर्ड ग्राऊंड सोसायटी आणि आयडियल सोसायटीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.

सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार : विनायक देव
सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार : प्रिया मुळे
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : राधिका वैशंपायन

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments