बेंगळुरू येथील बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धा घेतली जाते. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू ह्या संस्थेने केले.
22 आणि 23 ऑगस्ट २०२६ रोजी हा समारंभ बेंगळूरु येथे महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या सभागृहात दिमाखात संपन्न झाला.
22 ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून पाहुणे यायला सुरुवात झाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीश पतके, सन्मार्थी केंद्र प्रमुख, विद्यार्थी मार्गदर्शक आणि पारितोषिक विजेते विद्यार्थी बेंगळूरु नगरी जमले होते. 23 तारखेला सकाळी परीक्षा सल्लागार श्री. सुभाष वाघमारे, परीक्षा प्रमुख श्री. मिलिंद करंदीकर, प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीश पतके यांच्या बरोबर केंद्र प्रमुख आणि विद्यार्थी मार्गदर्शक यांची संयुक्त बैठक झाली. ह्या स्पर्धेचा प्रसार कसा करता येईल, ह्यावर चर्चा झाली. परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय हा विषय चर्चिला गेला. पतके सरांनी योग्य मार्गदर्शन केले. भोजनोपरांत कर्नाटक राज्यातील विविध मराठी मंडळाबरोबर श्री. गिरीश पतके यांनी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना आणि त्याचा आवाका समजावून सांगितला.
पारितोषिक वितरण ह्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र मंडळाच्या ‘महानाद’ ह्या ढोलताशा पथकाच्या दमदार वादनाने झाली. पारंपरिक हात आणि नवीन ताल ह्यामुळे वादन रंजक आणि आकर्षक झाले. श्री गणेशाच्या स्वागताची नांदीच जणू.
सभागृह मराठमोळ्या वातावरणाने भारून गेले होते. अरविंद कन्सल्टन्सीचे सी ई ओ श्री. संजीव केसकर यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. विशेष अतिथी म्हणून जे. डी. होम्सचे श्री. जयदीप भालेराव उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीश पतके, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर, प्रधान कार्यवाह श्री. शेखर अमीन, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब शिंदे आणि इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बेंगळूरु बाहेरून आलेल्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि बेंगळूरुमधील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, म्हैसूर फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर करमणूकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू गेली सहा वर्ष ऑनलाईन मराठी शाळा चालवत आहे. शाळेतील मुलांनी ते शाळेत काय आणि कसे शिकतात, ह्याचे छोटेसे प्रात्यक्षिक विविध माध्यमातून केले.
मराठी प्रतिष्ठानचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘MPB चा फेव्हरेट कोण?’ ही नृत्य स्पर्धा. जानेवारी 2026 मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीच्या सहयोगाने ही स्पर्धा संपन्न झाली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांनी नयनरम्य सादरीकरण केले.
बेंगळूरुमधील उभरत्या गायिकांचा गृप ‘द सुरीली सखीज’. त्यांनी मराठी लोकगीत, संगीतावर आधारित ‘मृद्गंध’ हा विशेष कार्यक्रम सादर केला. त्यांच्या गाण्यावर रसिक श्रोते टाळ्या वाजवून, ताल धरून दाद देत होते. दोन अडीच तास सुरू असलेला हा करमणूकीचा कार्यक्रम सर्वांच्या मनावर कायमचा कोरला गेला.
स्वादिष्ट मराठमोळ्या जेवणाने समारंभाची सांगता झाली.


