Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedअथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रमासाठी बीएमसीसी आणि 'दगडूशेठ' गणपती ट्रस्टमध्ये सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक...

अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रमासाठी बीएमसीसी आणि ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टमध्ये सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून अभ्यासक्रमाची निर्मिती

पुणे : बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यासाठी बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे सामंजस्य करार करण्यात आला. हा करार तीन वर्षांसाठी असून, या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक ज्ञानाचा डिजिटल माध्यमातून प्रसार करण्याबरोबरच गाणपत्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दीपक पौडेल, उपप्राचार्य प्रा. डॉ. भारती उपाध्ये, प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. वर्षा देशपांडे, प्रा. डॉ. राजेश्री गोखले तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष शमहेश सूर्यवंशी, विश्वस्त व उत्सवप्रमुख अमोल केदारी आणि ओंकार कलढोणकर उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून ह्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या उपक्रमांतर्गत विविध अल्पकालीन तसेच ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बीएमसीसी हे या उपक्रमासाठी शैक्षणिक व्यासपीठ म्हणून काम करणार असून, ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण व मानकीकरण करण्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा वापर करून आध्यात्मिक विचारांमध्ये रुची असलेल्या व्यक्तींना अभ्यासक्रमांशी जोडण्यात येणार आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रम बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राबविण्यात येणार असून, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र, तर महाविद्यालयाच्या वतीने श्रेयांक देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अथर्वशीर्ष पठणासोबतच त्यामागील आध्यात्मिक व सांस्कृतिक विचारांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

या उपक्रमासाठी बीएमसीसीकडून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी संस्कृत विभाग प्रमुख डॉ. स्वानंद गजानन पुंड आणि ट्रस्टकडून अध्यक्ष सुनील रासने हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

(अधिक माहितीसाठी मो. 98223 56827)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments