पुणे, 1 सप्टेंबर 2026: भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमध्ये इटलीतील DEKA International कंपनीच्या अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानावर आधारित Toro Pico Nano आणि RedTouch PRO या दोन प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात आली आहे. जियोमेडिक्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने या तंत्रज्ञानाचे लोकार्पण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
त्वचारोग क्षेत्रातील आधुनिक लेझर-आधारित उपचार पद्धती तसेच वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. विद्यापीठ संचालित अध्यापन रुग्णालयात अशा विशेषीकृत प्लॅटफॉर्मची उपलब्धता विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थींना आणि डॉक्टरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यास उपयुक्त ठरणार आहे.
Toro Pico Nano हा विशेषीकृत त्वचारोगविषयक लेझर प्लॅटफॉर्म असून, विशिष्ट प्रकारच्या पिग्मेंटेशनशी संबंधित त्वचाविषयक समस्यांच्या व्यवस्थापनासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर RedTouch PRO हे 675 nm wavelength वर आधारित regenerative laser technology प्लॅटफॉर्म आहे. कोलॅजनच्या पुनर्रचनेसाठी तसेच विशिष्ट melanin आणि pigmentation-related concerns हाताळण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर रुग्णाचे वैद्यकीय मूल्यांकन आणि निर्धारित क्लिनिकल प्रोटोकॉलनुसार केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक साओजी, मेडिकल डायरेक्टर व उपप्राचार्य डॉ. संजय ललवाणी, त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. विद्याधर सरदेसाई, DEKA International, Italy चे प्रमुख श्री. फ्रान्सेस्को बादी, जियोमेडिक्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सोमन बॅनर्जी, डायरेक्टर – सेल्स अँड मार्केटिंग श्री. नीहार गांधी, तसेच त्वचारोग तज्ज्ञ, प्राध्यापक आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. विवेक साओजी म्हणाले, “भविष्यातील डॉक्टरांना तयार करताना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय करून देणे आवश्यक आहे. अध्यापन रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरांना त्याचा शैक्षणिक व क्लिनिकल दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल.”
डॉ. संजय ललवाणी यांनी सांगितले की, आधुनिक त्वचारोग चिकित्सा आणि वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. डॉ. विद्याधर सरदेसाई यांनीही अशा तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक त्वचारोगशास्त्र समजून घेण्यास मदत होईल, असे नमूद केले.
या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे भारती हॉस्पिटलमध्ये त्वचारोगविषयक क्लिनिकल सेवा, प्रशिक्षण आणि आधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत.


