पुणे : पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाचा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय व कॅलीपर्स मोफत बसविणाऱ्या नवभारत विकास फाउंडेशन (संलग्न – भारत विकास परिषद) या संस्थेला प्रदान करण्यात आला. तसेच समाजोपयोगी कार्यासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वरनगर आणि अभिनव कलाभारती यांना ‘सेवाव्रत गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि उद्योजक पुनीत बालन व श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, केशव नेऊरगावकर, अभिजीत बर्वे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी तसेच पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी गणेश मंडळांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. गणेश मंडळांशी संघर्ष करण्याची पोलिसांची कोणतीही भूमिका नाही. उलट, नियमांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे. पुणेकर नागरिकांना मी आश्वस्त करतो की, यंदा ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत निश्चितच सुधारणा दिसून येईल.
ते पुढे म्हणाले, गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून, डेसिबलच्या निर्धारित मर्यादेचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला नियमांच्या चौकटीत सण-उत्सव साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचाही विचार करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगि
तले.


