पुणे, दि. ४ (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे चारचाकी वाहनांसाठी ‘NS’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून घेऊ इच्छिणाऱ्या वाहनमालकांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज करावा.
अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात. डीडी DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे पुणे येथील नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेचा असावा.
चारचाकी वाहन क्रमांकाची यादी ९ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी सादर करावयाचा असल्यास तो सीलबंद पाकिटात ९ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत जमा करावा. लिफाफे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित क्रमांक ऑनलाइन पद्धतीने आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. तसेच आरक्षणाच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास आरक्षित क्रमांक आपोआप रद्द होऊन शुल्क सरकारजमा होईल. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत अथवा समायोजित करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाच्या शुल्कात बदल झाल्यास त्यावेळी लागू असलेले विहित शुल्क आकारण्यात येईल.
00000


