“महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळलाच पाहिजे हा संघटनेचा निर्धार – संदीप खर्डेकर.
“वुशू” ह्या खेळाच्या २३ व्या सब-ज्युनियर व २४ व्या ज्युनियर राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेचे पुणे-आळंदी येथे अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाले.
वुशू च्या या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते केंद्रीय राज्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी डिजिटल माध्यमाद्वारे स्पर्धेतील खेळाडू, पंच, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत “महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च कामगिरी करावी”, अशा शुभेच्छा दिल्या. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यास
श्री. चैतन्य महाराज लोंढे “कबीर” (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान ), श्री. प्रशांत दादा कुऱ्हाडे (नगराध्यक्ष, आळंदी), सौ. सुजाता ताई तापकीर (उपनगराध्यक्ष, आळंदी), वुशू फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव श्री. सोपान कटके,
महाराष्ट्र वुशू असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, महासचिव ललिताताई कटके तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त श्री. संदीप शेलार, कु. प्रतीक्षा शिंदे आणि कु. तृप्ती चांदवडकर,
अशोकराव उनेरगरकर, संजय घुंडरे पाटील, भाजपा नेते व उद्योजक राजनभाई परदेशी, पतीत पावन संघटनेचे प्रांत सचिव मनोज नायर, संघटक, गोकुळ शेलार, श्री. मनोज पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑलिम्पिक असो, एशियन गेम्स असोत, वर्ल्ड चॅम्पियनशिप असो किंवा अन्य कोणतीही सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो—महाराष्ट्राचा खेळाडू त्या व्यासपीठावर खेळलाच पाहिजे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र वुशू असोसिएशन चा असल्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
यासाठी खेळाडूंना दर्जेदार स्पर्धा, प्रशिक्षण, मार्गदर्शन, पंचगिरीचे प्रशिक्षण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी आणि आवश्यक ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक सोपानराव कटके यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही संदीप खर्डेकर म्हणाले.
“वुशू” च्या ह्या दैदीप्यमान वाटचालीत १६ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची क्रीडा चळवळीत भक्कम साथ लाभली असून महाराष्ट्रातील वुशू खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्षम करण्यासाठी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन सातत्याने कार्यरत आहे.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचा केवळ स्पर्धा आयोजित करण्यापुरता मर्यादित दृष्टिकोन नसून, महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविणे हेच संघटनेचे अंतिम ध्येय आहे.
यावेळी अंतरराष्ट्रीय पंच,व महाराष्ट्र वुशू असोसिएशन चे समन्वयक सोपानराव कटके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे की श्री. सोपान कटके हे महाराष्ट्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय वुशू पंच असून, आगामी एशियन गेम्ससाठी भारतातून निवड झालेल्या एकमेव वुशू आंतरराष्ट्रीय पंचांपैकी/एकमेव भारतीय वुशू पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे, ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केली.
सोपानराव कटके यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आशियाई स्पर्धा, साऊथ एशियन गेम्स तसेच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
खेळाडू घडविण्यासोबतच जागतिक दर्जाचे पंच घडविण्याचे कामही महाराष्ट्रात होत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
ह्या स्पर्धे दरम्यान एका
कवितेतून महाराष्ट्राच्या वुशूचा संकल्प जाहीर करण्यात आला.
«घामाच्या थेंबातून स्वप्नांना आकार देऊ,
महाराष्ट्राच्या मातीला विश्वविजेते साकार देऊ.
तिरंगा घेऊन जगाच्या मैदानावर उभे राहू,
वुशूच्या प्रत्येक वारातून महाराष्ट्राचा जयघोष करू!
ऑलिम्पिकचे स्वप्न डोळ्यांत घेऊ,
एशियन गेम्सची शिखरे गाठू,
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या व्यासपीठावर,
महाराष्ट्राचा तिरंगा अभिमानाने फडकवू!
खेळाडू घडतील, पंच घडतील, प्रशिक्षक घडतील,
महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळेल.
एकच ध्यास, एकच विश्वास—
“महाराष्ट्राचा खेळाडू जगात सर्वोच्च झाला पाहिजे!”»
या स्पर्धेतून महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंची निवड होऊन त्यांना पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ पदकांसाठीची लढत नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक खेळाडूंच्या निर्मितीची पहिली पायरी ठरणार आहे असे महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या सचिव ललिता कटके म्हणाल्या.
“आजचा खेळाडू उद्याचा राष्ट्रीय विजेता,
उद्याचा राष्ट्रीय विजेता भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू,
आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू—महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकविजेता!”
हा विश्वास मनात ठेवून ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांसाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.
“महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळलाच पाहिजे” हा संघटनेचा संकल्प मुख्य संदेश म्हणून ठळक ठेवला आहे असे सोपानराव कटके यांनी आवर्जून नमूद केले.
ह्या स्पर्धेत सब ज्युनियर ( चौदा वर्षा खालील ) १५४ मुली व
२१५ मुलं तर ज्युनियर ( अठरा वर्षाखालील )
११५ मुली व २४० मुलांनी भाग घेतला असून तब्ब्ल ७२५ स्पर्धक ताऊलू आणि सान्सू च्या विविध प्रकारात भाग घेत आहेत.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बाल व युवा खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून ७२५ स्पर्धक खेळाडूंच्या जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण क्रीडांगण अक्षरश: दुमदुमून गेले.


