पुणे, 8 सप्टेंबर २०२६: नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या, भारतात सुरु झालेल्या आणि जगातील आघाडीच्या हवामानविषयक विचारमंचांपैकी एक असलेल्या, कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (सी ई ई डब्ल्यू ) तर्फे आज पुण्यात “महाराष्ट्रात ग्रामीण महिला स्वच्छ-ऊर्जा आधारित उपजीविका नवकल्पनांचा स्वीकार कशा प्रकारे वाढवत आहेत” या विषयावर गोलमेज चर्चेचे आयोजन करण्यात आले. ‘सखी’ मॉडेलच्या माध्यमातून विकेंद्रित अक्षय ऊर्जा (डी आर ई टेक्नोलॉजी) उपाययोजनांचा स्वीकार वाढवता येऊ शकतो आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना मिळू शकते हे या चर्चेमध्ये अधोरेखित करण्यात आले.
कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू) च्या प्रोग्रॅम लीड दिव्या गौर म्हणाल्या की “ग्रामीण महिला केवळ स्वच्छ-ऊर्जा तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीत, तर त्यातून स्वतःसाठी अतिरिक्त आर्थिक संधीही निर्माण करत आहेत, हे सखी मॉडेल ने दाखवून दिले आहे. अपुरी माहिती, उपलब्धता आणि वित्तपुरवठ्याशी संबंधित अडथळ्यांमुळे दीर्घकाळापासून तंत्रज्ञानाचा स्वीकार मर्यादित ठेवणाऱ्या आव्हानांवर त्यांनी आपल्या समुदायांमधील विश्वासाचा प्रभावी वापर करून मात केली आहे. उद्योजिका, हवामानविषयक पुरस्कर्ते आणि उपजीविका सल्लागार म्हणून सखी या शेतकरी आणि ग्रामीण उद्योगांना अधिक लवचिक आणि कमी-कार्बन आधारित उपजीविकेच्या दिशेने बदल करण्यास सक्षम करत आहेत. त्याचवेळी त्या स्वतःसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहेत. त्यांचे नेतृत्व हे स्पष्टपणे दाखवते की महिलांचे सक्षमीकरण हा केवळ लैंगिक समानता साध्य करण्याचा मार्ग नाही, तर स्वच्छ ऊर्जेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, ग्रामीण उपजीविका मजबूत करण्यासाठी आणि भारताच्या हवामान-सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे वाटचालीला गती देण्यासाठी ही एक प्रभावी धोरण आहे.”
सीईईडब्ल्यू च्या 2023 मधील अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 28 लाख कुटुंबांच्या उपजीविकेत सुधारणा घडवून आणण्याची क्षमता असलेल्या सुमारे 15 लाख स्वच्छ-ऊर्जा आधारित उपजीविका तंत्रज्ञानांची उपलब्धता असूनही त्यांचा स्वीकार मर्यादित राहिला. या उपजीविका तंत्रज्ञानामध्ये सोलर ड्रायर्स, लघु फलोत्पादन प्रक्रिया यंत्रे आणि इतर तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
या तंत्रज्ञानांचा स्वीकार मर्यादित राहण्यामागील प्रमुख का रणांमध्ये शेतकरी आणि सूक्ष्म उद्योगांना या उपाययोजनांविषयी पुरेशी माहिती नसणे, नवीन तंत्रज्ञानावर मर्यादित विश्वास, स्थानिक पातळीवर या तंत्रज्ञानाची मर्यादित उपलब्धता आणि परवडणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या पर्यायांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी यांचा समावेश आहे.
सखी मॉडेल: महिलांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारी परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न
या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सीईईडब्ल्यू आणि विलग्रो इनोव्हेशन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या पॉवरिंग लाइव्हलीहुड्स ने सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज (SURE) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा उद्देश ग्रामीण महाराष्ट्रात स्वच्छ-ऊर्जा आधारित उपजीविका तंत्रज्ञानांचा स्वीकार वेगाने वाढवणे हा आहे.
सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज हा महिलांना केंद्रस्थानी ठेवणारा सामाजिक उपक्रम असून, सखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशिक्षित महिला उद्योजिकांच्या माध्यमातून हवामान-सक्षम उपजीविका (क्लायमेट स्मार्ट लाईवलीहूड ), स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्य व कल्याणविषयक उपाययोजनांचे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो.
सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज ने महाराष्ट्रातील 350 ग्रामीण महिलांना “सखी” (महिलांच्या मैत्रिणी) म्हणून प्रशिक्षित करून त्यांना स्वच्छ-ऊर्जा क्षेत्रातील उद्योजिका बनवले आहे.
तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यांपासून तंत्रज्ञानाच्या प्रसारकांपर्यंत
सखी गावपातळीवर प्रात्यक्षिके आयोजित करतात, स्वतः तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि समुदायातील विश्वासार्ह संबंधांचा उपयोग करून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच विक्रीलाही चालना देतात. याशिवाय, सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज ने तीन जिल्ह्यांमध्ये अनुभव केंद्रे (एक्सपीरियन्स सेंटर्स) सुरू केली आहेत. ही केंद्रे प्रात्यक्षिक आणि अनुभवाधारित प्रशिक्षणाची केंद्रे म्हणून काम करतात. येथे सखी प्रत्यक्ष प्रशिक्षण देतात. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजक कोणतेही तंत्रज्ञान खरेदी करण्यापूर्वी ते प्रत्यक्ष पाहू, हाताळू, वापरू आणि समजून घेऊ शकतात.
जागरूकता निर्माण करण्याची प्रक्रिया केवळ जाहिरात किंवा प्रचारापुरती मर्यादित न ठेवता, हे परस्पर-सहभागी प्रारूप विश्वासावर आधारित आणि समुदायाच्या सहभागातून होणाऱ्या तंत्रज्ञान स्वीकाराच्या प्रक्रियेत रूपांतरित करते.
केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत, सखी नेटवर्क ने रोड शो, गावपातळीवरील मोहिमा, व्यापारविषयक सक्रियता कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि समुदाय बैठका यांच्या माध्यमातून जवळपास ३०,००० संभाव्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे.या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात १४०० हून अधिक स्वच्छ-ऊर्जा आधारित उपजीविका तंत्रज्ञानांचा वापर सुरू करण्यात मदत झाली आहे.
क्लायमेट चॅम्पियन लीग : महिलांना हवामान नेतृत्वाच्या भूमिकेत आणणारा उपक्रम
क्लायमेट चॅम्पियन लीग (सीसीएल) ही सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज सोबत राबविण्यात आलेली प्रोत्साहनाधारित मोहीम आहे. सखी नेटवर्कच्या माध्यमातून स्वच्छ-ऊर्जा आधारित उपजीविका तंत्रज्ञानांचा स्वीकार वेगाने वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
क्लायमेट चॅम्पियन लीग (CCL) पासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेल्या या मोहिमेचे स्वरूप 50 दिवसांत तंत्रज्ञान-वापर वाढविण्याच्या आव्हानाचे होते. लाइव्ह लीडर बोर्ड, सहकाऱ्यांमध्ये स्पर्धा आणि कामगिरीवर आधारित बक्षिसांच्या माध्यमातून 350 ग्रामस्तरीय उद्योजक- सखी (Village Level Entrepreneurs – VLEs) सहभागी झाले. यामुळे संपूर्ण मोहिमेदरम्यान त्यांचा उत्साह आणि प्रेरणा कायम राहिली.
या उपक्रमातून 1.75 कोटी रुपयांहून अधिक विक्री झाली आणि 1,500 हून अधिक उपजीविकांना आधार मिळाला. तसेच, शेवटच्या टप्प्यापर्यंत डीआरई तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढविण्यासोबतच उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये विविधता आणण्यास मदत झाली. यामधून ग्रामीण समुदायांची आर्थिक आणि उपजीविकेची लवचिकता अधिक मजबूत झाली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सखींना सार्वजनिकरित्या गौरविण्यात आले आणि त्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे नेटवर्कमध्ये यशाची दखल घेण्यासोबतच इतर महिलांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
सखींच्या प्रेरणादायी कथा
फरजाना बेग या महाराष्ट्रातील धाराशिव तालुका व जिल्ह्यातील गौडगाव गावच्या रहिवासी असून सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज (Sakhi Unique Resource Enterprise, SURE) च्या सखी म्हणून काम करत आहेत. त्यांनी मे 2025 मध्ये सोलर ड्रायर डी500 (Solar Dryer D500) स्वीकारला आणि अडीच महिन्यांत 100 किलोहून अधिक वाळवलेला आंबा आणि 40 किलो वाळवलेला कढीपत्ता यांवर प्रक्रिया करून 30,000 रुपये कमावले. हा वाळवलेला माल राहेजा कंपनी (Raheja Company) ने अनुक्रमे 450 रुपये प्रति किलो व 120 रुपये प्रति किलो या अधिक दराने खरेदी केला. स्वतःच्या उद्योगापलीकडे जाऊन फरजाना वर्गीकरण व प्रक्रियेसारख्या कामांमध्ये मदत करण्यासाठी गावातील इतर महिलांना कामावर ठेवतात आणि स्थानिक पातळीवर रोजगारही निर्माण करतात. त्यांच्या या यशामुळे इतरांनाही सोलर ड्रायर घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण महिला उद्योजकतेचा एक आदर्श म्हणून त्या आपला सोलर ड्रायिंग व्यवसाय पुढे उभारत आहेत.
जयश्री माळी या महाराष्ट्रातील धाराशिव तालुका व जिल्ह्यातील तेर गावच्या रहिवासी असून SURE च्या सखी आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी डीडी सोलर (DD Solar) च्या आधारे आपला व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे त्यांचा भाजीपाला ताजा राहतो. यातून त्यांना प्रकाश व पंख्याचीही सुविधा मिळते आणि घरगुती वीज खर्च कमी होतो. यामुळे त्यांना दरमहा 3,000 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. डीडी सोलरसोबतच त्यांनी बायोगॅस, हायड्रोपोनिक युनिट (hydroponic units) व सेंद्रिय खत यांसारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांचा प्रसार केला आहे आणि समुदायातील इतर लोकांना उपजीविकेचे नवे पर्याय शोधण्यास मदत केली आहे. तळागाळातील आत्मविश्वास आणि सामुदायिक सहभाग यांतून शाश्वत ग्रामीण उद्योजकता कशी उभी राहू शकते, हे त्यांचा प्रवास दाखवतो.
सुजाता गोरख पाटील या महाराष्ट्रातील धाराशिवमधील शिंगोली गावात राहतात आणि ब्लॉक कोऑर्डिनेटर असण्यासोबतच SURE च्या सखी आहेत. शेती व समाजकार्यातील भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी घेऊन त्या या कामात आल्या आहेत. त्यांनी कृषी पदविका, एम.ए. व मास्टर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work) अशा शैक्षणिक पात्रता मिळवल्या आहेत. SURE मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी एका कृषी महाविद्यालयात अध्यापन कर्मचारी म्हणून काम केले आहे. आज त्या दरमहा सुमारे 30,000 रुपये कमावतात आणि उपजीविका व महिला नेतृत्व बळकट करण्यासाठी ग्रामीण समुदायांसोबत जवळून काम करतात. त्यांच्या कामात शाश्वत शेती, महिला सशक्तीकरण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, आणि सरकारी योजना व वित्तीय उपाय यांपर्यंतची सुलभ पोहोच यांचा समावेश आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी व सुधारित पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुजाता प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांचे अनुभव, डिजिटल लर्निंग आणि ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण यांचा वापर करतात.
उर्मिला प्रवीण कलदाते या महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये SURE सोबत बिझनेस करस्पॉन्डंट (Business Correspondent) आहेत. उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी व ग्रामीण उद्योजकता बळकट करण्यासाठी त्या फेब्रुवारी 2026 मध्ये SURE मध्ये रुजू झाल्या. SURE सोबतच्या कामातून त्यांचे मासिक उत्पन्न 16,000 रुपयांवरून 20,000 रुपयांपर्यंत वाढले आहे. उर्मिला महिलांना प्रशिक्षण देतात व त्यांना प्रेरित करतात, की त्यांनी उपजीविकेच्या नव्या संधी शोधाव्यात, अत्यंत कमी किंवा कोणत्याही वैयक्तिक गुंतवणुकीशिवाय सखी आधारित व्यवसाय सुरू करावेत, आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास कमवावा. त्यांच्या कामाचा परिणाम विस्तारत आहे आणि त्यांच्या गावातील इतर महिलांना सखी नेटवर्कमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळत आहे.


