Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुचिपुडीच्या लयीत शनिवारी रंगणार ‘रंगप्रवेशम्’ वैजयंती काशी, प्रतीक्षा काशी यांच्या उपस्थितीत...

कुचिपुडीच्या लयीत शनिवारी रंगणार ‘रंगप्रवेशम्’ वैजयंती काशी, प्रतीक्षा काशी यांच्या उपस्थितीत विशेष नृत्य सोहळा; सयुजा मुजुमदारचा रंगप्रवेशम्

 

 

पुणे : समर्चना स्कूल ऑफ डान्सच्या वतीने युवा नृत्यांगना सयुजा मुजुमदार हिचा कुचिपुडी ‘रंगप्रवेशम्’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सोहळ्यात सयुजा आपल्या अनेक वर्षांच्या नृत्यसाधनेचे सादरीकरण करणार आहे.

 

या सोहळ्याला कुचिपुडी परंपरेतील मान्यवर कलाकारांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त नृत्य चूडामणी वैजयंती काशी प्रमुख अतिथी म्हणून, तर नृत्य निपुणा प्रतीक्षा काशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

वयाच्या पाचव्या वर्षापासून नृत्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या सयुजाने भरतनाट्यम आणि कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यप्रकारांसह योगासने, बॅले आणि समकालीन नृत्याचाही अभ्यास केला आहे. कुचिपुडीचे प्राथमिक प्रशिक्षण तिने गुरू नमिता मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. त्यानंतर प्रख्यात कुचिपुडी नृत्यांगना नृत्य चूडामणी श्रीमती वैजयंती काशी यांच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कलाप्रवासाला अधिक समृद्ध दिशा मिळाली.

 

कुचिपुडी नृत्यांगनेसाठी ‘रंगप्रवेशम्’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेक वर्षांचे शिक्षण, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि गुरूंचे मार्गदर्शन यांचा परिपाक या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर येतो. त्यामुळे सयुजाचा हा रंगप्रवेशम् तिच्या कलात्मक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

 

सयुजाच्या कलाप्रवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या गुरू नमिता मुजुमदार या तिच्या आईदेखील आहेत. त्यामुळे या रंगप्रवेशम् सोहळ्यात गुरूंकडून मिळालेले संस्कार, आईचे प्रेम, कुटुंबाचे पाठबळ आणि अनेक वर्षांची नृत्यसाधना यांचा संगम पाहायला मिळणार आहे.

 

कुचिपुडीच्या सुंदर आविष्कार सादर करणाऱ्या या सोहळ्यात भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेची समृद्ध झलक रसिकांना अनुभवता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments