*विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी संवाद*
पुणे, दि. १०:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या दावे व हरकती वर सुनावण्या घेण्यात येणार आहेत.प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश अंतिम मतदार यादीत होईल यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी सोबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, बैठकीस अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, रोहयो सहआयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी
ओमप्रकाश दिवटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत बगाडे, उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती तेली म्हणाल्या,
विशेष मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागातील प्रत्येक जिल्ह्याला तीन भेटी देण्यात येणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया मतदार केंद्रित असणार आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रशासनासोबत काम करत आहेत. मतदार यादीतील मयत, स्थलांतरित, दुबार नावे वर्षानुवर्षे तसेच राहतात. या कार्यक्रमांतर्गत सर्वंकष मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही व भारतीय नसलेला अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाही यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
एसआयआर पूर्वी असलेल्या ९० लाख ८० हजार मतदारांपैकी सुमारे २८ लाख मतदार एएसडीडी यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र याबाबत विसंगती असल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून ॲप द्वारे दुरुस्त करुन घ्यावी. राजकीय पक्षांनी मतदारांना सुनावणीवेळी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन करावे. मतदारांच्या सोयीच्या ठिकाणी सुनावणी घेण्यासाठी क्षेत्र निवडावे. राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी प्रारूप मतदार यादी तपासून घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक आणि अपंग सुनावणीसाठी उपस्थित राहू शकत नसल्यास त्यांच्या वतीने प्रतिनिधी मार्फत कागदपत्रे सादर करू शकतात. त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहू शकत नसल्यास अधिकाऱ्यांमार्फत घरी जाऊन कागदपत्र स्वीकारले जातील. मतदान केंद्र सुसूत्रीकरणांमध्ये एका छताखाली राहणारे मतदार एकाच मतदान केंद्रात येतील या दृष्टीने निकषानुसार सुसूत्रीकरण करण्यात यावे, पोर्टल मार्फत नोटीस जनरेट झाल्यानंतर सुनावणी ठिकाणांचे वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आमदार पठारे यांनी मतदार केंद्रनिहाय प्रारूप यादी मिळावी तसेच मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुनावण्या ठेवल्यास नागरिकांना सोयीचे होईल असे सूचना केल्या.
श्रीमती कळसकर यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी, एएसडीडी यादी, एसआयआर पूर्वीचे मतदार आदींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीला भारतीय जनता पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
००००


