Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्याची अनुष्का बनसोडे ‘मिस अर्थ इंडिया’ राष्ट्रीय अंतिम फेरीत ...

पुण्याची अनुष्का बनसोडे ‘मिस अर्थ इंडिया’ राष्ट्रीय अंतिम फेरीत पर्यावरण संवर्धन आणि रंगभेदाविरोधातील जनजागृतीचा संदेश घेऊन मॉडेलिंग क्षेत्रातील यशस्वी प्रवास

 

पुणे : पुण्याची २१ वर्षीय युवा मॉडेल अनुष्का बनसोडे हिने आपल्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर मॉडेलिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून ती सध्या प्रतिष्ठेच्या ‘मिस अर्थ इंडिया’ स्पर्धेच्या राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी झाली आहे.

 

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अनुष्काने गेल्या पाच वर्षांत देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स आणि फॅशन प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजिओ, मिंत्रा, नायका फॅशन, ॲमेझॉन आणि टाटा क्लिक लक्झरी यांसारख्या नामांकित प्लॅटफॉर्मसाठी ती मॉडेल म्हणून झळकली आहे.

 

फॅशन क्षेत्रातील तिच्या यशस्वी वाटचालीत तिने सुप्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर रॉकी स्टार यांच्यासाठी रॅम्प वॉक केला असून प्रतिष्ठेच्या लॅक्मे फॅशन वीकमध्येही सहभाग नोंदवत आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे. तसेच तिला टीजीपीसी टॅलेंट ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला असून तिच्या कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

 

अनुष्का बनसोडे हिची ओळख केवळ यशस्वी मॉडेल म्हणून नसून समाजाभिमुख विचारांची युवा व्यक्तिमत्त्व म्हणूनही होत आहे. तिच्या जनजागृती अभियानाचा मुख्य विषय पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली हा असून, विशेषतः युवा पिढीमध्ये निसर्गाचे संरक्षण, पर्यावरणपूरक सवयी आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

 

यासोबतच एक सावळ्या वर्णाची मॉडेल म्हणून अनुष्का समाजातील रंगभेदाच्या मानसिकतेला आव्हान देत सौंदर्याच्या पारंपरिक संकल्पना बदलण्याचा संदेश देत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या नैसर्गिक त्वचेचा रंग अभिमानाने स्वीकारावा, आत्मविश्वासाने स्वतःची ओळख निर्माण करावी आणि सौंदर्याची व्याख्या ही विविधतेत आहे, हा संदेश ती आपल्या प्रवासातून युवा पिढीपर्यंत पोहोचवत आहे.

 

‘मिस अर्थ इंडिया’च्या राष्ट्रीय अंतिम फेरीत पुण्याचे प्रतिनिधित्व करताना अनुष्का बनसोडे हिचे ध्येय केवळ मुकुट जिंकणे नसून पर्यावरण, आत्मविश्वास, सर्वसमावेशक सौंदर्य आणि सकारात्मक सामाजिक बदल यांचा प्रभावी आवाज बनणे हे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments