Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रश्न एआयला नव्हे, शिक्षकांना विचारा! प्रा. हिमकुमार चॅटर्जी यांच्या हस्ते डॉ. सुधाकर...

प्रश्न एआयला नव्हे, शिक्षकांना विचारा! प्रा. हिमकुमार चॅटर्जी यांच्या हस्ते डॉ. सुधाकर चव्हाण यांना ‘विश्वारंभ कला’ पुरस्कार प्रदान

पुणे : कुठलीही संस्था किंवा विद्यापीठ हे तेथील इमारतींमुळे नव्हे, तर शिक्षकांमुळे आणि त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांमुळे नावलौकिक मिळवत असते. कुठल्याही विषयाची संकल्पना समजावून, अनुभवून देण्याचे कौशल्य हे केवळ शिक्षकांमध्ये असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयला नव्हे, तर शिक्षकांना प्रश्न विचारायला हवेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध भित्तिचित्रकार तथा मुंबईतील प्रतिष्ठित ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन’ या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हिमकुमार चॅटर्जी यांनी केले.

 

ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे, तर्फे आयोजित ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी हजारो कलाशिक्षकांना घडविणारा शिल्पकार अशी ओळख असणारे वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा प्रख्यात दृश्यकलाकार डॉ. सुधाकर चव्हाण यांना दृश्यकलेतील अनन्यसाधारण योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव श्री. अमित चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

याप्रसंगी माईर्स एमआयटी एडीटी समूहाच्या कार्यकारी संचालक सौ.ज्योती कराड-ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, एमआयटी स्कूल ऑफ फाइन आर्ट्सचे अधिष्ठाता डॉ. गणेश तरतरे आदी उपस्थित होते.

 

चॅटर्जी पुढे म्हणाले, “कलाकृती ही कलाकारापेक्षा अधिक आयुष्य घेऊन जन्माला येते. त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व अखेरीस शांती व तृप्तीच्या रसाचा आनंद घ्यावा. कारण कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते.”

 

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘एक्यू’ मासिकाचे प्रकाशन तसेच ‘कलाकोश’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच, एमआयटी स्कूल ऑफ फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

 

विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रा. शिरिन चिमथानवाल व प्रा. टेरेसा जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. विराज कांबळे यांनी आभार मानले.

 

कोट

“‘विश्वारंभ’ या नावातच काहीतरी नावीन्यपूर्ण तयार करण्याची संकल्पना आहे. या नावामागे मार्गदर्शक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची प्रेरणा आहे. प्रा. डॉ. कराड हेही एक सुंदर कलाकार आहेत. जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट आणि विश्वराजबागेची बांधणी या त्यांच्याच दृष्टीतून साकारलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत. त्यामुळे डॉ. सुधाकर चव्हाण यांना ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ प्रदान करताना अत्यानंद होत आहे.”

 

— सौ. ज्योती ढाकणे-कराड

कार्यकारी संचालक, एमआयटी एडीटी, विद्यापीठ, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments