Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश प्रणाली’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश प्रणाली’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद १४ हजार ७२३ नागरिकांनी तयार केली खाती; ३९ हजार ४४३ नागरिकांनी घेतला आगाऊ नोंदणीचा लाभ

पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने १ मे २०२६ पासून ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या डिजिटल सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, १ मे २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद झाली आहे. यापैकी ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून महापालिका मुख्य इमारतीस भेट दिली आहे. तसेच आतापर्यंत १४ हजार ७२३ नागरिकांनी या प्रणालीवर आपली लॉगिन खाती तयार केली आहेत.

 

 

 

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अनावश्यक प्रतीक्षा टाळता यावी आणि नागरिकांच्या भेटीची अचूक डिजिटल नोंद उपलब्ध राहावी, या उद्देशाने ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या भेटीची ऑनलाइन नोंदणी करता येत असून, संबंधित विभागाची निवड करून निश्चित दिवशी महापालिका मुख्य इमारतीत प्रवेश घेता येतो.

 

….

 

सर्वाधिक भेटी दिलेले विभाग

 

 

 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली सुरू झाल्यापासून नागरिकांनी विविध विभागांना भेटी देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी भेट दिलेल्या पहिल्या दहा विभागांमध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागास ९ हजार ३६१, नगररचना विभागास ४ हजार ३११, स्थापत्य विभागास ३ हजार ७९२, महापौर कार्यालयास २ हजार ३०६, वैद्यकीय विभागास २ हजार ४०३, आरोग्य विभागास १ हजार ९२०, पर्यावरण अभियांत्रिकी विभागास १ हजार ५७१, पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागास १ हजार ४९१, आयुक्त कार्यालयास १ हजार ३३० आणि लेखा विभागास १ हजार २४९ नागरिकांनी भेट दिली आहे.

 

 

 

यावरून महापालिकेच्या विविध प्रशासकीय व नागरी सेवा विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून डिजिटल प्रवेश व्यवस्थेचा प्रभावीपणे वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

 

……

 

संकेतस्थळावरून सहज नोंदणी

 

 

 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आपले लॉगिन अकाऊंट तयार करावे लागते. त्यासाठी पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरावी लागते.

 

 

 

लॉगिन अकाऊंट तयार करण्याची प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी नव्याने माहिती भरण्याची आवश्यकता नसून, नागरिक आपल्या लॉगिनद्वारे थेट प्रवेशासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोबाईल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी केली जाते. तसेच महापालिका मुख्य इमारतीत प्रत्येक प्रवेशाच्या वेळीही ओटीपी प्रणालीचा वापर करण्यात येतो. नागरिकांना एका भेटीसाठी किमान एक आणि कमाल तीन विभागांची निवड करता येते.

 

….

 

पुढील सात दिवसांतील उपलब्ध तारखांची सुविधा

 

 

 

नागरिकांना नोंदणी करताना नोंदणीच्या दिवसापासून पुढील सात दिवसांपर्यंत उपलब्ध असलेल्या तारखा प्रणालीवर दिसतात. यामध्ये शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळण्यात येतात. उपलब्ध तारखांपैकी इच्छित दिनांक आणि संबंधित विभाग निवडून नागरिकांना आपल्या भेटीची ऑनलाइन नोंदणी करता येते.

 

 

 

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर क्यूआर कोड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होते. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर हा क्यूआर कोड दाखविल्यानंतर तो स्कॅन करून नागरिकांचा प्रवेश सुनिश्चित केला जातो.

 

 

 

नोंदणीच्या वेळी क्यूआर कोड डाउनलोड करणे शक्य झाले नसल्यास, नागरिक आपल्या लॉगिन अकाऊंटमध्ये प्रवेश करून तो नंतरही डाउनलोड करू शकतात. तसेच आगाऊ तारखेसाठी नोंदणी केली असल्यास संबंधित प्रवेशाच्या दिवशी क्यूआर कोड डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

……

 

वेळेची बचत, पारदर्शकता आणि सुरक्षित प्रवेशावर भर

 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीमुळे महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांची प्रवेश प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि डिजिटल झाली आहे. नागरिकांना भेटीपूर्वीच संबंधित विभाग व दिनांक निश्चित करता येत असल्याने प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रवेशाची डिजिटल नोंद उपलब्ध होत असल्याने प्रवेश व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता निर्माण झाली आहे.

 

 

 

महापालिकेच्या वतीने नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट देण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करूनच यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

…..

 

कोट

 

 

 

महापालिकेच्या सेवा नागरिककेंद्रित, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज आहे. ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना महापालिका मुख्य इमारतीत येण्यापूर्वीच आपल्या भेटीची नोंदणी करता येत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच प्रवेश व्यवस्थेत शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण होत आहे. या प्रणालीला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून, भविष्यात नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा डिजिटल सुविधांचा अधिक विस्तार करण्यात येईल. नागरिकांनी शक्यतो आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

 

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments