पुणे, दि. १७ : मुळशी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाहनानुसार मुळशी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन औद्योगिक क्षेत्रातील विविध अडचणी मांडल्या. यावेळी मैत्री पोर्टलवर प्राप्त झालेल्या १७ प्रलंबित तक्रारींचाही आढावा घेण्यात आला. या तक्रारी संबंधित विभागांनी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
मुळशी औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर जिल्हा परिषदेने, तर पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामांवर पीएमआरडीएने नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. औद्योगिक क्षेत्रातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ट्रान्सफॉर्मरशी संबंधित समस्या महावितरणने आवश्यकतेनुसार सोडवावी, असेही निर्देश देण्यात आले.
घोटावडे फाटा व परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पीएमपीएमएल यांनी समन्वयाने कार्यवाही करावी. वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. मुळशी औद्योगिक क्षेत्रातील बसथांब्याचे स्थलांतर करण्याच्या मागणीवर पीएमपीएमएलने आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
मुळशी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या समस्यांबाबत पीएमआरडीएने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मुळशी औद्योगिक क्षेत्राची भविष्यातील गरज लक्षात घेऊन परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
मुळशी औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रश्न संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने सोडवावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान, जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठीही दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समस्या नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उद्योग प्रतिनिधींनी या दिवशी आपल्या समस्या नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.


