गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा आणि सांस्कृतिक उत्सव नसून समाजप्रबोधनाचेही प्रभावी माध्यम आहे. याच उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने गणेशोत्सवात ‘लोकसंवाद–२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध गणेश मंडळांसमोर सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्हे आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने नागरिकांच्या उपयोगासाठी सायबर सुरक्षेशी संबंधित ही माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली आहे.
आज मोबाईल आणि इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग, खरेदी, गुंतवणूक, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमुळे अनेक कामे सहज झाली असली तरी त्याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना भीती दाखवतात, आकर्षक आमिषे देतात किंवा भावनिक दबाव निर्माण करतात. त्यामुळे अनोळखी फोन, संदेश, लिंक किंवा ऑनलाइन ओळखीवर सहज विश्वास न ठेवता प्रत्येक वेळी खातरजमा करणे आवश्यक आहे.
यातील एक गंभीर प्रकार म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’. यामध्ये सायबर गुन्हेगार स्वतःला पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवतात. तुमच्या नावावर गुन्हा दाखल आहे, तुमच्या खात्यात बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत, अशी भीती दाखवून व्हिडीओ कॉलवर चौकशीच्या नावाखाली नागरिकांना जोडून ठेवले जाते आणि पैसे देण्याची मागणी केली जाते. लक्षात ठेवा, कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची तपास यंत्रणा फोन किंवा व्हिडीओ कॉलवर कारवाई न करण्याच्या बदल्यात पैसे मागत नाही. त्यामुळे अशा फोनला घाबरून पैसे देऊ नका आणि अनोळखी व्हिडीओ कॉल स्वीकारणे टाळा.
तुमचा मोबाईल क्रमांक बंद होणार आहे, केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा तुमच्या क्रमांकावर गैरप्रकार झाल्याचे सांगून दूरसंचार विभागाच्या किंवा ‘ट्राय’च्या नावानेही फसवणूक केली जाते. अशा वेळी कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे देण्यापूर्वी संबंधित दूरसंचार सेवा प्रदात्याच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खातरजमा करावी.
तुमच्या नावाचे पार्सल सीमाशुल्क विभागाने अडवले आहे, त्यामध्ये बेकायदेशीर वस्तू सापडल्या आहेत, त्यामुळे दंड भरावा लागेल, असे सांगूनही नागरिकांना लक्ष्य केले जाते. आपण कोणतेही पार्सल मागवले नसल्यास अशा फोनवर विश्वास ठेवू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि बँक खात्याची माहिती देऊ नये.
अनोळखी व्यक्तींकडून होणारे व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल हेही धोकादायक ठरू शकतात. काही प्रकरणांमध्ये महिलेचा पूर्व-रेकॉर्ड केलेला व्हिडीओ दाखवून समोरच्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. त्यात फेरफार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. या प्रकाराला ‘सेक्सटॉर्शन’ म्हणतात. अशा प्रकाराला बळी पडल्यास घाबरून पैसे देऊ नयेत. उपलब्ध पुरावे जतन करून तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
‘घरबसल्या काम करा आणि मोठी कमाई करा’, ‘टास्क पूर्ण करा आणि पैसे मिळवा’, अशा जाहिराती किंवा टेलिग्राम-व्हॉट्सॲप समूहांपासूनही सावध राहणे गरजेचे आहे. सुरुवातीला थोडे पैसे देऊन विश्वास संपादन केला जातो आणि नंतर अधिक पैसे गुंतवण्यास सांगून मोठी रक्कम लुबाडली जाते. त्याचप्रमाणे शेअर बाजार, आयपीओ, बिटकॉईन किंवा अन्य गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था आणि मध्यस्थ अधिकृत आहेत का, याची खातरजमा करावी. व्यवहार केवळ अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळावरूनच करावा.
‘तुमचे वीज बिल थकीत आहे, आजच पैसे भरले नाहीत तर वीजपुरवठा बंद होईल’ किंवा ‘गॅस बिल न भरल्याने जोडणी बंद होणार आहे’, अशा संदेशांद्वारेही घाई निर्माण केली जाते. अशा संदेशातील लिंकवर क्लिक करण्याऐवजी संबंधित वीज किंवा गॅस कंपनीच्या अधिकृत माध्यमातून बिलाची माहिती तपासावी.
कमी कागदपत्रांत तातडीने कर्ज देण्याचे आमिष दाखवणाऱ्या बनावट कर्ज ॲपपासूनही सावध राहणे आवश्यक आहे. अशा ॲपच्या माध्यमातून मोबाईलमधील फोटो, संपर्क यादी आणि अन्य संवेदनशील माहिती मिळवली जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी ॲप किंवा एपीके फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये आणि ॲपला अनावश्यक परवानग्या देऊ नयेत.
*अनोळखी एपीके फाइल डाउनलोड करू नका*
सायबर गुन्हेगार नागरिकांना विविध कारणे सांगून एपीके फाइलची लिंक पाठवतात. ‘SBI.apk’, ‘RTO Challan.apk’, ‘e-Challan.apk’, ‘MNGL.apk’ अशा नावांच्या फाइल पाठवून त्या डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा अनोळखी किंवा बनावट एपीके फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यास, त्यांना दिलेल्या परवानग्यांनुसार मोबाईलमधील संवेदनशील माहितीचा गैरवापर होऊ शकतो. मोबाईलवरील माहिती, एसएमएस किंवा इतर सुविधांचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या एपीके लिंकवर क्लिक करू नये. एसबीआय, आरटीओ, ई-चलान किंवा एमएनजीएलच्या नावाने आलेल्या संशयास्पद फाइल डाउनलोड करू नयेत. मोबाईलमध्ये अनोळखी ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. बँकिंगसंबंधी माहिती किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये. संशयास्पद लिंक प्राप्त झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहितीची खातरजमा करावी.
*आपले बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नका*
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून किंवा अन्य कारणे सांगून त्यांचे बँक खाते, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा इतर बँकिंग सुविधा वापरण्यास मागितल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे आपले बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यास दिल्यास, सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे आपल्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यानंतर ते पैसे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी आपल्या खात्याचा वापर केला जाऊ शकतो.
आपले बँक खाते सायबर गुन्ह्यातील पैशांच्या व्यवहारासाठी वापरले गेल्यास तपासामध्ये आपल्या भूमिकेची चौकशी होऊ शकते. गुन्ह्याचे स्वरूप आणि उपलब्ध पुराव्यांनुसार कायदेशीर कारवाईची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. बँक खाते क्रमांक, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड, एटीएम पिन आणि ओटीपी गोपनीय ठेवावा. आपल्या खात्यात अनोळखी किंवा संशयास्पद रक्कम जमा झाल्यास ती परस्पर दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करू नये. अशा प्रकारचा व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी आणि पोलिसांशी संपर्क साधावा.
समाजमाध्यमे किंवा डेटिंग ॲपवर झालेल्या ऑनलाइन ओळखीतून पैसे, वैयक्तिक माहिती किंवा महागड्या भेटवस्तूंची मागणी केली जात असल्यास सावध राहावे. ‘पैशांची मागणी करणाऱ्या ऑनलाइन प्रेमावर विश्वास ठेवू नका’ हा नियम लक्षात ठेवावा. तसेच, ‘तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत, ते परत पाठवा’, असे सांगणाऱ्यांपासूनही सावध राहावे. अशा वेळी स्वतःहून पैसे परत न पाठवता बँकेशी संपर्क साधून व्यवहाराची खातरजमा करावी.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याचे तपशील, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, आधार-पॅनची प्रत, फोटो किंवा पत्ता देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. आर्थिक आणि समाजमाध्यम खात्यांसाठी वेगवेगळे, मजबूत आणि किमान १२ अक्षरांचे पासवर्ड वापरावेत. द्विस्तरीय प्रमाणीकरणाची सुविधा सुरू ठेवावी. अनोळखी टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप समूहात जोडले गेल्यास तातडीने त्या समूहातून बाहेर पडावे. व्हॉट्सॲपच्या गोपनीयता सेटिंगमध्ये आपल्या संपर्कातील व्यक्तींनाच समूहात जोडता येईल, अशी व्यवस्था करावी.
समाजमाध्यमे म्हणजे आपली वैयक्तिक डायरी नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक माहिती, प्रवास, ठिकाण, कुटुंबीयांची माहिती किंवा अन्य संवेदनशील तपशील सार्वजनिक करणे टाळावे. अनोळखी व्यक्तींच्या मैत्री विनंत्या स्वीकारण्यापूर्वी त्यांची ओळख तपासावी. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या नावाने पैसे मागितले तरी प्रत्यक्ष फोन करून खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत. आर्थिक खात्यांमध्ये असुरक्षित किंवा सार्वजनिक संगणकावरून प्रवेश करणे टाळावे. ई-मेलमधील पाठवणाऱ्याचा डोमेन आणि संकेतस्थळाच्या पत्त्यातील स्पेलिंग तपासावे.
सायबर फसवणूक झाली तर घाबरू नका आणि वेळ वाया घालवू नका. तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. पुणे शहरातील नागरिक सायबर पोलीस ठाणे, शिवाजीनगर, पुणे शहर येथेही संपर्क साधू शकतात. उपलब्ध संपर्क क्रमांक ७०५८७१९३७५ / ७०५८७१९३७१ असून ई-मेल crimecyber.pune@nic.in आहे.
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संचार साथीच्या सीईआयआर (CEIR) सुविधेचा वापर करता येतो. यासाठी मोबाईलचा आयएमईआय (IMEI) क्रमांक आवश्यक असतो. हा क्रमांक मोबाईलच्या बॉक्सवर किंवा उपलब्ध असल्यास बॅटरीच्या मागील बाजूस असलेल्या स्टिकरवर आढळतो. मोबाईल हाताशी असल्यास *#06# हा क्रमांक डायल करूनही आयएमईआय क्रमांक पाहता येतो. संचार साथी संकेतस्थळावरून हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलला ब्लॉक करण्याची प्रक्रिया करता येते. आपल्या नावावर किती मोबाईल क्रमांक सुरू आहेत, हे तपासण्यासाठीही संचार साथीवरील टीएएफसीओपी (TAFCOP) सुविधेचा वापर करता येतो.
सायबर सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे घाई करू नका, घाबरू नका आणि खातरजमा केल्याशिवाय कोणतीही माहिती किंवा पैसे देऊ नका. सायबर गुन्हेगार कितीही विश्वासार्ह भाषेत बोलत असले तरी त्यांच्या सांगण्यावरून तातडीने आर्थिक व्यवहार करू नका. एपीके डाउनलोड केल्याने मोबाईलमधील संवेदनशील माहिती धोक्यात येऊ शकते, तर बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यास दिल्यास सायबर गुन्ह्यातील आर्थिक व्यवहाराच्या तपासात आपली चौकशी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एका फोनकॉलमुळे, एका लिंकवर क्लिक केल्यामुळे किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे डिजिटल जगात वावरताना सावधगिरी, जागरूकता आणि जबाबदारी हीच आपली खरी सुरक्षा आहे.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क करा. सावध राहा, सुरक्षित राहा!
*संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे*


