पुणे, दि. २० : आरोग्य सेवा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गरज असून, निरोगी नागरिक हे समाज आणि देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू केला आहे. या दवाखान्यांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोमल पडवळ यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत वाघेश्वर तरुण मंडळ, फडई येथे ‘आपला दवाखाना’ योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. कोमल पडवळ यांनी नागरिकांना योजनेची माहिती देत प्राथमिक आरोग्य सेवांचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. पडवळ म्हणाल्या, नागरिकांना सहज उपलब्ध, सुलभ आणि परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी, हा ‘आपला दवाखाना’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः शहरी आणि गरजू भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच डॉक्टरांचा सल्ला, औषधे तसेच आवश्यक प्राथमिक तपासण्या उपलब्ध होण्यास या उपक्रमामुळे मदत होते.
किरकोळ आजारांसाठीही अनेक नागरिकांना मोठ्या रुग्णालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे रुग्णालयांवरील गर्दी वाढण्याबरोबरच नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च परवडत नसल्याने वेळेवर उपचार घेण्यात अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता नागरिकांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ‘आपला दवाखाना’ या संकल्पनेमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. पडवळ यांनी यावेळी केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष निखील भाडळे, उपाध्यक्ष निखील तांबे, मंडळाचे इतर सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.


