पुणे, दि. २४: अटल पेन्शन योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने अटल पेन्शन योजनेचा राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रम पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. बँक ऑफ महाराष्ट्र, राज्यस्तरीय बँकर्स समिती, पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्रातील जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक या कार्यक्रमास उपस्थित होते.
१८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांना अटल पेन्शन योजनेशी मोठ्या प्रमाणावर जोडण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, स्वयंरोजगार करणारे नागरिक, ग्रामीण व निमशहरी भागातील पात्र नागरिक यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचवून त्यांना पेन्शनच्या माध्यमातून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेशी जोडण्यावर भर देण्यात आला.
यावेळी पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रवेश कुमार यांनी बँकांनी अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रत्येक बँकेने आपल्या शाखांच्या माध्यमातून योजनेची प्रचार-प्रसार वाढवावी, पात्र नागरिकांची नोंदणी करावी तसेच शाखा, सेवा क्षेत्रातील गावे आणि विविध ठिकाणी जनजागृती मेळावे आयोजित करून नागरिकांना योजनेची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
“अटल पेन्शन योजना ही केवळ पेन्शन योजना नसून नागरिकांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार आहे,” असे नमूद करत त्यांनी बँकांनी अधिकाधिक नागरिकांना या योजनेशी जोडण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा गौरव आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहभागी बँका आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्य बँकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य राज्यस्तरीय बँकर्स समितीचे महाव्यवस्थापक विवेक नाचणे यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक अटल पेन्शन योजना नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील सर्व बँका, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना विशेष महत्त्वाची असून, “गावागावात योजना पोहोचविणे आणि पात्र नागरिकांना योजनेत सहभागी करून घेणे” यावर आगामी काळात विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील बँकांना अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीसोबतच व्यापक जनजागृती, शाखास्तरीय मोहिमा आणि गावपातळीवरील मेळावे आयोजित करण्यासाठी दिशा देण्यात आली.
राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत अटल पेन्शन योजनेची माहिती पोहोचवून “सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षित भविष्य” या उद्दिष्टाच्या दिशेने महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी बँकिंग क्षेत्राने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
००००


