पुणे, दि. २५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि. २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे, नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.
पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना १८, तर शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांनी नमुना १९ अनुषंगाने अर्ज करावा. शिक्षक मतदारांसाठी संबंधित संस्थेच्या प्रमुखांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रक्रियेबाबतची माहिती तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या mahaelection.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्रता असलेल्या नागरिकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा. मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाची बाब असून पात्र पदवीधर व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.


