पुणे, दि. २६ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित कामांचा निपटारा करणे तसेच गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
अभियानांतर्गत जन्म-मृत्यू नोंदणी, विविध दाखले व प्रमाणपत्रे, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांना शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
गावांतील शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी तसेच अन्य सार्वजनिक संस्थांमधील मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता, संरक्षण भिंत, परसबाग तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
*जलसंधारण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनावर भर*
अभियानाच्या माध्यमातून जलस्रोतांची स्वच्छता, जलसंधारण, पाणीपुरवठा व वैयक्तिक नळजोडणी, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेशी संबंधित उपक्रमांनाही अभियानात महत्त्व देण्यात आले आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण व ॲनिमियाबाबत जनजागृती, महिला आरोग्य व स्वच्छता, बचत गटांचे सक्षमीकरण तसेच महिला शेतकरी उत्पादक संस्थांशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीत स्थानिक गरजेनुसार ठोस व दृश्यमान बदल घडवून आणण्यासाठी ‘वन जीपी–वन व्हिजिबल चेंज’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, योग-ध्यान सत्र, प्लास्टिकमुक्ती, रस्ता सुरक्षा, जलसंधारण, कचरा वर्गीकरण, सायबर सुरक्षा, मतदार जागरूकता आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासारख्या विविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १ हजार ३९९ ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
*विविध योजनांच्या लाभासाठी विशेष मोहीम*
अभियानाच्या कालावधीत स्वामित्व नकाशे व चौकशी नोंदवह्यांचे वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनदांचे वितरण, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील घरकुलांचे वाटप व गृहप्रवेश, प्रलंबित बांधकाम परवानग्या व ना-हरकत दाखल्यांचा निपटारा, वैयक्तिक नळजोडणीसाठी विशेष मोहीम तसेच कृषी योजनांसाठी ऑनलाइन नोंदणी यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय ५ हजार नवीन महिला बचत गटांची स्थापना व बँक खाती उघडणे, प्रत्येक तालुक्यात किमान १०० लाभार्थींच्या घरांवर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत १ किलोवॅट क्षमतेचे सौर वीज प्रकल्प उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, शाळा व अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधांची पूर्तता तसेच ई-ऑफिस प्रणालीचा वापर वाढविणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
*मानवी रांगोळी, चित्रकला स्पर्धा आणि ‘सेवा ज्योत यात्रा’*
१७ सप्टेंबर रोजी प्रमुख सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर आधारित मानवी रांगोळीचे आयोजन करण्यात येणार आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान शासकीय व खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत संकल्प’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘विकसित भारत २०४७’ची संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ‘सेवा ज्योत यात्रा’ आयोजित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष विकासकामांना आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती देण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
००००


