Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सने ₹३,०५४ कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सने ₹३,०५४ कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राला सेवा देणाऱ्या तंत्रज्ञानाधारित बी२बी प्लॅटफॉर्मने प्रस्तावित इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. या आयपीओमध्ये ₹१,३०० कोटींपर्यंतच्या नवीन समभागांची विक्री (फ्रेश इश्यू) आणि ₹१,७५४.०१ कोटींपर्यंतच्या विद्यमान समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) यांचा समावेश आहे. त्यामुळे आयपीओचा एकूण आकार ₹३,०५४.०१ कोटींपर्यंत आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेड आणि मित्सुई अँड कंपनी लिमिटेड हे विद्यमान भागधारक आपले समभाग विक्रीस काढणार आहेत.

 

 

 

नवीन समभागांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर चार प्रमुख उद्देशांसाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. यामध्ये विपणन आणि ब्रँड उभारणीच्या खर्चासाठी जेएसडब्ल्यू वन डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (जेओडीएल)मध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान व प्लॅटफॉर्म विकासावरील खर्च, भांडवली पाया मजबूत करण्यासाठी जेएसडब्ल्यू वन फायनान्स लिमिटेड (जेओएफएल)मध्ये गुंतवणूक आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टे यांचा समावेश आहे. यापैकी जेओडीएलमध्ये ₹१२५ कोटी आणि जेओएफएलमध्ये ₹५०० कोटी गुंतवण्याचा प्रस्ताव आहे, तर तंत्रज्ञान व प्लॅटफॉर्म विकासासाठी ₹३५० कोटींपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे.

 

 

 

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्स एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म चालवते. या प्लॅटफॉर्मद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) उत्पादन आणि बांधकाम साहित्याच्या विक्रेत्यांशी जोडले जाते. व्यापार, अंतर्भूत वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, प्रक्रिया व कस्टमायझेशन तसेच खासगी ब्रँड्स अशा विविध सुविधा या प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यात आल्या आहेत. ३० जून २०२६ पर्यंत प्लॅटफॉर्मवर ९५,६११ नोंदणीकृत ग्राहक, १६५ ब्रँड्स आणि १,७१३ विक्रेते होते. कंपनीचे नेटवर्क ६,९६३ पिन कोडपर्यंत सेवा पुरवण्याची क्षमता असलेले असून, त्याला ८१ लॉजिस्टिक्स भागीदार, १२ कंत्राटी सेवा केंद्रे आणि ९ कंत्राटी उत्पादकांचे पाठबळ आहे.

 

 

 

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ₹५,७४३.३९ कोटींपर्यंत पोहोचला, जो आर्थिक वर्ष २०२५ मधील ₹३,९६२.८१ कोटींच्या तुलनेत ४४.९३ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे ग्रॉस मर्चंडाइज व्हॅल्यू (GMV) आर्थिक वर्ष २०२५ मधील ₹१२,५६४.८४ कोटींवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ₹१८,५९६.९१ कोटींवर पोहोचले. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल ₹१,६४२.४५ कोटी, तर GMV ₹५,९४९.७३ कोटी होते. या तिमाहीत कंपनीने ₹२२.८९ कोटींचा EBITDA आणि ₹१४.२१ कोटींचा करोत्तर नफा नोंदवला.

 

 

 

वनलॅटिस (1Lattice)च्या उद्योग अहवालानुसार, भारतातील बी२बी व्यापार जवळपास २ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा असल्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्पादन क्षेत्रातील वस्तूंची संभाव्य बाजारपेठ जवळपास ₹८,८३६.१ अब्ज, तर बांधकाम उत्पादनांची बाजारपेठ जवळपास ₹११,३००.८ अब्ज होती. देशाच्या उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रांतील बी२बी व्यापारात डिजिटल माध्यमाचा वाटा आर्थिक वर्ष २०२६ (अंदाजित)मध्ये सुमारे ३ टक्के होता. यावरून या क्षेत्रात डिजिटायझेशनची प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे दिसून येते.

 

 

 

जेएम फायनान्शियल लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि पीएल कॅपिटल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments