Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअन्नामृत फाउंडेशनतर्फे तासाला पाच हजार इडली तयार होणार* स्वयंचलित मशीनचे उद्घाटन...

अन्नामृत फाउंडेशनतर्फे तासाला पाच हजार इडली तयार होणार* स्वयंचलित मशीनचे उद्घाटन ; तब्बल २०० शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार

 

 

पुणे : माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पुण्यातील २०० शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या अन्नामृत फाउंडेशनच्या पिंपरी येथील स्वयंपाकघरात तासाला पाच हजार इडली तयार करणाऱ्या स्वयंचलित मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनमुळे मोठ्या प्रमाणात इडली तयार करणे शक्य होणार असून, अन्नामृत फाउंडेशनच्या पोषण आहार उपक्रमात इडलीचा समावेश केला जाणार आहे.

 

कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा राज्य सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर आणि इस्कॉनच्या आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाचे कमिशनर गौरांग प्रभू, अन्नामृत फाउंडेशनचे प्रवक्ते डॉ. जनार्दन चितोडे उपस्थित होते.

 

अन्नामृत फाउंडेशनचे प्रवक्ते डॉ. जनार्दन चितोडे म्हणाले, अन्नामृत फाउंडेशनतर्फे पुण्यातील २०० शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार दिला जातो. या आहारामध्ये विविध प्रकारच्या डाळी, भात, पुलाव, तीळ चिक्की, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू आणि फळांचा समावेश केला जातो,

 

अन्नामृत फाउंडेशनचे संचालक संजय भोसले म्हणाले, स्वयंचलित इडली मशीनसाठी आर्थिक योगदान दिल्याबद्दल ओरिएंटल रबर कंपनीचे अन्नामृत फाउंडेशन आभारी आहे. बजाज मोटर्स, मुकुल माधव फाउंडेशन यांच्यासह अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून पोषण आहाराच्या उपक्रमाला हातभार लावत आहेत. अन्नामृत फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

 

चंद्रकांत पाटील यांनी अन्नामृत फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. भविष्यात शासनाकडून सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गौरांग प्रभू यांनी कॅनडा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी इस्कॉनच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची आठवण सांगितली. वाजपेयी हे इस्कॉन मंदिराला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अन्नामृत फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संजय टिकू आणि विश्वस्त धीरज वर्मा यांनी देशभरात सुरू असलेल्या पोषण आहार उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जनार्दन चितोडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments