Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा संकल्प’मधून आश्रमशाळांमध्ये ज्ञान, आरोग्य अन् पर्यावरणाचा जागर* ...

सेवा संकल्प’मधून आश्रमशाळांमध्ये ज्ञान, आरोग्य अन् पर्यावरणाचा जागर* *नर्सिंग मार्गदर्शन, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, आरोग्य जनजागृती आणि निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

 

 

 

पुणे, दि.३०: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक जाणिवांना चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मुथाळणे येथे विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसाय व त्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक संधी, आवश्यक कौशल्ये तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या विविध वाटांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

 

जुन्नर आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. आंबे आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याबरोबरच सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि अभ्यासाची सवय विकसित करण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

 

शासकीय कन्या आश्रमशाळा, सोमतवाडी येथे ॲनिमिया तसेच मासिक पाळीविषयीचे समज-गैरसमज या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी या मार्गदर्शनाचा विद्यार्थिनींना लाभ झाला.

 

वडेश्वर आश्रमशाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर विचार मांडण्याची संधी देत त्यांच्या लेखनकौशल्याला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले.

या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आरोग्य, पर्यावरण, स्पर्धात्मकता, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाणीव यांना बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments