Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा संकल्प अभियानातून भोर नगरपरिषदेचा आरोग्य व स्वच्छतेचा जागर*

सेवा संकल्प अभियानातून भोर नगरपरिषदेचा आरोग्य व स्वच्छतेचा जागर*

 

 

पुणे, दि.१: सेवा संकल्प अभियानांतर्गत भोर नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी कळविली आहे.

 

अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी शहरातील चार ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये नागरिकांसोबतच नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

दरम्यान, ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. याशिवाय अभियानाच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण आणि घरगुती कंपोस्टिंग (होम कंपोस्ट) याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देत ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, घरच्या घरी सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याची पद्धत आणि स्वच्छ शहरासाठी नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

 

आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून, स्वच्छ आणि निरोगी भोरच्या निर्मितीसाठी नगरपरिषदेच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग लाभत आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments