पुणे, दि. २ (जिमाका वृत्तसेवा) : पाण्याचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि कार्यक्षम वापराबाबत नागरिक, शेतकरी व विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी राज्यात दि. २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘जलसेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ येथे कार्यकारी संचालक संजीव चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला.
बदलते हवामान, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी तसेच उपलब्ध जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता पाण्याचा काटेकोर व विवेकपूर्ण वापर करण्याबाबत समाजामध्ये जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत असून, जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, जलसाक्षरता वाढविणे आणि जलव्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागामार्फत विविध जलस्रोत व जलसंपदा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अधिक परिणामकारक आणि शाश्वत वापर करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिक, शेतकरी, पाणी वापर संस्था आणि सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे संवर्धन करणे तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन जलस्रोतांचे नियोजन करण्याबाबत जनजागृती अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत जलसंपदा प्रकल्पांच्या लाभार्थ्यांशी आणि पाणी वापर संस्थांशी संवाद साधण्यात येणार आहे. शेतकऱ्यांमध्ये उपलब्ध पाण्यानुसार पीक नियोजन, पाणी बचत आणि कार्यक्षम सिंचन पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच प्रकल्पग्रस्त व पुनर्वसित नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. विद्यार्थी व नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्रे, स्वयंसेवी संस्था, जलतज्ज्ञ आणि संबंधित संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी संजीव चोपडे यांनी ‘जलसेवा संकल्प अभियान’ हे केवळ कार्यक्रमांचे आयोजन न राहता पाण्याबाबत समाजामध्ये दीर्घकालीन जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणारे अभियान ठरावे, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. पाण्याचे संवर्धन, योग्य नियोजन आणि कार्यक्षम वापरासाठी शासन व समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी विशेष प्रकल्प, पुणे (मुख्यालय सोलापूर)चे मुख्य अभियंता प्रविण कोल्हे, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्यासह महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दि. २ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात नागरिक, शेतकरी, पाणी वापर संस्था, महिला, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि जलतज्ज्ञांनी सक्रिय सहभाग घेऊन पाणी संवर्धन, जलसाक्षरता आणि कार्यक्षम जलवापराबाबतची जाणीव अधिक व्यापक करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


