Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा संदेश; गांधी जयंतीनिमित्त दौंडमध्ये स्वच्छता अभियान*

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा संदेश; गांधी जयंतीनिमित्त दौंडमध्ये स्वच्छता अभियान*

 

 

पुणे, दि. ३: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना कृतीची जोड देत गांधी जयंतीनिमित्त दौंड शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत मंडई ते गांधी चौक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

 

या उपक्रमात दौंड नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ दौंड, धन निरंकारी सेवा संस्था आणि संस्कार स्कूल यांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कामगारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले.

 

गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या अभियानातून ‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे’, हा प्रभावी संदेश देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास स्वच्छ व सुंदर दौंडची संकल्पना अधिक प्रभावीपणे साकार होऊ शकते, यावर यावेळी भर देण्यात आला.

 

केवळ स्वच्छता मोहीम राबविण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणांविषयी जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

 

गांधी जयंतीसोबतच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी दौंडच्या निर्मितीसाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments