Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ संवादिनी वादक शारंगधर साठे यांना पं. दत्तात्रय कासलीकर संवादिनी वादन पुरस्कार...

ज्येष्ठ संवादिनी वादक शारंगधर साठे यांना पं. दत्तात्रय कासलीकर संवादिनी वादन पुरस्कार गायक पं. मनोहरराव कासलीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम पुरस्कार प्रदान

 

पुणे : प्रसिद्ध गायक पं. मनोहरराव कासलीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दत्तात्रय संगीत शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे चंद्रपूर येथे आयोजित दत्त मनोहर संगीत समारोहात ज्येष्ठ संवादिनी वादक प्रा. शारंगधर साठे यांना पं. दत्तात्रय कासलीकर संवादिनी वादन पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकल संवादिनी वादन तसेच संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नवीन पिढीतील आश्वासक गायक विशाल मोघे यांना पं. मनोहरराव कासलीकर शास्त्रीय गायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र भागवत होते. प्रमुख पाहुण्या डॉ. राजलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिवक्ता रवींद्र भागवत आणि डॉ. राजलक्ष्मी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विवेक कासलीकर यांच्यासह अनेक कलाकार आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

कासलीकर घराणे मूळचे अमरावतीचे असून या घराण्यात संगीत कलेप्रती असलेल्या नितांत श्रद्धेमुळे काही मंडळींनी बडोदा संस्थानातील उस्ताद मौलाबक्ष यांच्या पठडीत तालीम घेतली. त्यातून या घराण्यात संगीत अभ्यासाची परंपरा सुरू झाली. पुढे पं. दत्तात्रय कासलीकर आणि पं. मनोहरराव कासलीकर हे दोन महत्त्वपूर्ण कलाकार या घराण्यातून उदयास आले. त्यांनी विदर्भात संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

 

पं. दत्तात्रय कासलीकर यांनी संवादिनीच्या एकल वादनासह साथसंगतीतही लौकिक मिळविला. नागपूर आकाशवाणीवरील संवादिनी वादनाचा पहिला कार्यक्रम त्यांचाच झाला होता. पं. मनोहरराव कासलीकर यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्याकडून तालीम घेतली होती. आपल्या गायनाने त्यांनी भारतभरातील रसिकांना आनंद दिला. चंद्रपूर येथे झालेल्या संगीत समारोहात विशाल मोघे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग बिहागने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर ठुमरी, टप्पा आणि भजन हे संगीतप्रकार उत्कृष्टपणे सादर केले. त्यांना तबल्यावर पुष्कर महाजन आणि संवादिनीवर डॉ. प्रवीण कासलीकर यांनी साथसंगत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments