पुणे : आता कविता ही जागतिक झाली आहे. ती केवळ वैयक्तिक राहिलेली नाही. याचे भान कवींनी ठेवले पाहिजे. आपल्या अक्षरांची उंची वाढवून कविता अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
वल्लरी मीडिया, पुणे प्रस्तुत वल्लरी प्रकाशनातर्फे प्रज्ञा कल्याणकर संपादित ‘मालिनी’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन म. भा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले. भारत इतिहास संशोधन मंडळातील वि.का. राजवाडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ लेखक-साहित्यिक दिलीप फलटणकर, लेखिका-कवयित्री संगीता पुराणिक, समर्थ फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष किरण इनामदार, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, वल्लरी प्रकाशनाच्या सल्लागार मानसी चिटणीस, यशदा अधिकारी व्यंकटेश कल्याणकर आदी उपस्थित होते.
‘मालिनी’ या काव्यसंग्रहात आकांक्षा बोभाटे, गजानन चोपडे, नुपूर दीक्षित, प्रांजली हारकूड, अलका जाधव, अमित जहागीरदार, हेमंत जोशी, सौमित्र केंजळे, प्रेरणा खुट्टे आणि स्वाती मेहेंदळे यांच्या कवितांचा समावेश आहे.
दिलीप फलटणकर म्हणाले, कविता ही फार नाजूक गोष्ट आहे. महाराष्ट्राला कवितेची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे कवीने या परंपरेचे भान ठेवत कविता तरल ठेवली पाहिजे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध कवींच्या कविता प्रेक्षकांना ऐकवून त्यांच्या काव्यस्मृती जागवल्या.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, समाजामध्ये आनंद पसरविण्याचा प्रयत्न कवितांच्या माध्यमातून होत असतो. नवोदित कवींना संधी देऊन हा आनंद समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम वल्लरी प्रकाशन करत आहे. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन लेखकांनी अभिव्यक्त व्हायला हवे.
कार्यक्रमाचे प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसं
चालन केले.


