पुणे, दि. ३० : जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ तसेच दि. १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित या अभियानांतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग, योग व ध्यान यांसह विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दि. ३० सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण २४ हजार ७२४ नागरिकांनी सहभाग नोंदविला असून, ९ हजार ९५६ लाभार्थींना विविध उपक्रमांचा लाभ मिळाला आहे.
हवेली तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५३६ नागरिकांची उपस्थिती असून १ हजार १४ लाभार्थींना लाभ मिळाला आहे. त्यानंतर शिरूरमध्ये २ हजार ३३० नागरिक सहभागी झाले असून ९३२ लाभार्थींना लाभ मिळाला. खेडमध्ये २ हजार २५२ नागरिकांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून ९०९ लाभार्थींना लाभ मिळाला आहे. जुन्नरमध्ये २ हजार २३० नागरिक सहभागी झाले असून ८९२ लाभार्थींना लाभ मिळाला आहे.
इंदापूर तालुक्यात २ हजार १७८ नागरिकांचा सहभाग असून ८७९ लाभार्थींना लाभ मिळाला. मावळमध्ये २ हजार ९२ नागरिक सहभागी झाले असून ८३७ लाभार्थींना, मुळशीमध्ये २ हजार ९ नागरिक सहभागी झाले असून ८०९ लाभार्थींना, तर पुरंदरमध्ये २ हजार ७० नागरिक सहभागी झाले असून ८२८ लाभार्थींना या उपक्रमांचा लाभ मिळाला आहे.
भोर तालुक्यात १ हजार ६४६ नागरिकांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून ६४८ लाभार्थींना लाभ मिळाला. दौंडमध्ये १ हजार ५४४ नागरिक सहभागी झाले असून ६३४ लाभार्थींना, बारामतीमध्ये १ हजार ४९३ नागरिक सहभागी झाले असून ५९७ लाभार्थींना, आंबेगावमध्ये १ हजार ३३४ नागरिक सहभागी झाले असून ५४९ लाभार्थींना, तर राजगडमध्ये १ हजार १० नागरिक सहभागी झाले असून ४२८ लाभार्थींना लाभ मिळाला आहे.
अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सामाजिक सहभाग याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी कालावधीतही विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी ‘सेवा माझे योगदान’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


