पुणे : दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या कलात्मक व उपयुक्त वस्तू तसेच खाद्य पदार्थांचे ‘प्रोत्साहन’ प्रदर्शन कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे दि. ९ व १० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य आहे.
सन २००३ पासून दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य निर्माण करण्याच्या उद्देशाने समविचारी मैत्रिणींच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. १८ ते ८० वयोगटातील विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना त्यांनी तयार केलेल्या कलात्मक व उपयुक्त वस्तू तसेच खाद्यपदार्थ मांडून त्यांची विक्री करण्याची संधी प्रदर्शनातून मिळते.
यंदा ३० दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांना प्रशिक्षण देणाऱ्या ८ संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या व्यवस्थापिका व म्युझिक थेरपिस्ट मेघना जोशी आणि विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती करून उमंग क्रिएशन स्टुडिओ येथे विक्री करणाऱ्या यशस्वी उद्योजिका मूकबधीर उमा जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल.
प्रदर्शनादरम्यान दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम, तसेच दृष्टीहीन व्यक्ती प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देऊन दिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


