पुणे : कृषी विकास ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये (बारामती) नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत एसआरएफटीआयच्या डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हिंसाचार आणि सामूहिक हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
कोलकाता, पश्चिम बंगाल येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये २७ सप्टेंबर २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पश्चिम बंगाल शाखेने आयोजित केलेल्या परिचय वर्ग कार्यक्रमावर एसआरएफटीआयच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक म्हणाले, ही लोकशाही संवाद आणि कायदेशीर चौकटीत ग्राहक हक्क, सार्वजनिक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीसाठी काम करणारी देशव्यापी संघटना आहे. ग्राहक पंचायतीच्या पश्चिम बंगाल शाखेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर करून आवश्यक शुल्क भरले होते. तसेच २७ सप्टेंबर रोजी एसआरएफटीआयच्या मुख्य सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्था प्रशासनाची पूर्व लेखी परवानगी घेतली होती.
कार्यक्रम सुरू होताच एसआरएफटीआयचे काही विद्यार्थी आणि बाहेरील व्यक्तींनी सभागृहात प्रवेश करून आझादी, हिंदू फॅसिझमचा प्रतिकार करा, मला हिंदुत्वाचा तिरस्कार आहे, आरएसएस परत जा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर ते मंचावर चढले आणि स्वामी विवेकानंद व भारतमातेचे बॅनर फाडून दोन्ही प्रतिमा पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात आला. ही घटना देशविरोधी मानसिकता दर्शवणारी असल्याचे पाठक यांनी म्हटले.
या हल्ल्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे चार कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले असून १२ जण गंभीर जखमी झाले. सभागृहात उपस्थित महिला आणि मुलांसह ७० कार्यकर्त्यांना सहा तास परिसरात थांबवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनासोबतही झटापट झाली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारी कार्यकारिणीच्या वतीने सूर्यकांत पाठक, विजय सागर, धनंजय गायकवाड आणि वीणा दीक्षित यांनी पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीची चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेची लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करावी आणि घटनेत सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेतून निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली. या घटनेत सहभागी असलेल्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.


