Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीमावर्ती भागात शिवराय-महाराणा प्रताप यांच्या शौर्याची प्रेरणा मिळेल ...

सीमावर्ती भागात शिवराय-महाराणा प्रताप यांच्या शौर्याची प्रेरणा मिळेल निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

 

 

पुण्यातील ‘शिवसृष्टी’तून ‘शिव-राणा शौर्य यात्रा’ रवाना; धर्मशाळा हिमाचल प्रदेश येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर जम्मू काश्मीरच्या पुंच येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा होणार प्रस्थापित

 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप हे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे पुतळे सीमावर्ती भागात प्रस्थापित केल्याने आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि शौर्यपरंपरेचा संदेश तेथील जवान तसेच नागरिकांपर्यंत पोहोचेल. पुंछसारख्या संवेदनशील भागात तसेच भारत-चीन सीमेकडे जाणाऱ्या या स्मारकांमुळे जवानांना आणि स्थानिक नागरिकांना प्रेरणा मिळेल, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

 

शिवसृष्टी, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, आम्ही मावळे आणि कॉसमॉस ग्रुप यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेच्या प्रारंभी शिवसृष्टी येथे दोन्ही पुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, शिल्पकार महिंद्र थोपटे, कॉसमॉस ग्रुपचे जनक शाह, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार आदी उपस्थित होते.

 

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांची ‘शिव-राणा शौर्य यात्रा’ रवाना झाली. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने आयोजित या यात्रेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हिमाचल प्रदेशच्या धर्म शाळेमध्ये येथे, तर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा जम्मू काश्मीरच्या पुंच येथे प्रस्थापित करण्यात येणार आहे.

 

डॉ. विलास वाहने म्हणाले, ‘आम्ही पुणेकर’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सीमेवरील जवानांना आणि देशवासीयांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची स्मारके सीमावर्ती भागात पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि सीमावर्ती भागात इतिहास व राष्ट्रभक्ती पोहोचविणारा हा उपक्रम आहे.

 

हेमंत जाधव म्हणाले, यापूर्वी कुपवाडा आणि पुंछ येथे नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच जपानमधील टोकियो येथेही शिवरायांचे स्मारक साकारण्यात आले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप या दोन महान योद्ध्यांचे पुतळे एकत्रितपणे सीमेकडे घेऊन जाण्याचा हा उपक्रम आहे.

 

ते पुढे म्हणाले, पुणे ते पुंछ आणि पुणे ते धर्मशाला असा सुमारे २१ हजार किलोमीटरचा हा प्रवास असेल. वडोदरा, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, पानिपत, जालंधर आणि पठाणकोट मार्गे ही यात्रा जम्मू, पुंछ आणि धर्मशाला येथे पोहोचेल.

 

गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतून ही यात्रा पुढे जाणार आहे. विविध ठिकाणी स्थानिक नागरिक, शिवप्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

 

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर तैनात भारतीय सैन्यदलातील जवानांना शौर्याची प्रेरणा मिळावी तसेच सीमावर्ती नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश सीमावर्ती भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास माने यांनी केले. आभार नरेंद्र डोईफोडे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments